गरीब महिलेचा भूखंड हडपणाऱ्यांना अभय Print

नागपूर / खास प्रतिनिधी
सोसायटीचे पदाधिकारी भूखंड हडपण्याचा प्रयत्न करीत असून पोलीस तक्रारीची दखल घेत नसल्याने जिवाला धोका निर्माण झाल्याची तक्रार एका पीडित महिलेने केली आहे. सीमा गिरीश महाजन यांच्या पतीने १९८८मध्ये खामल्यातील प्रकाश गृहनिर्माण सोसायटीत एक भूखंड घेतला. गिरीश महाजन यांच्या निधनानंतर मुलगी व मुलाला घेऊन त्या कामठीत राहायला गेल्या. त्यांचे पती अपंग होते. मुलगाही अपंग आहे. त्याच्यासाठी हा भूखंड त्यांनी विकला नाही. २००९ मध्ये सोसासटीचे तत्कालीन अध्यक्ष वसंत पाटील व सचिव अशोक राऊत यांनी भूखंडाचे मोजमाप केले होते. तेथे कुंपण बांधण्याचे सांगून त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र दिले. कर्ज काढून सीमा महाजन यांनी भूखंडावर बांधकाम केले. विद्यमान अध्यक्ष काळसर्पे यांनी हे बांधकाम थांबवले. धमकी देऊन सीमा महाजन यांना भूखंडावर येण्यापासून रोखले जात असून बनावट नोंदींच्या आधारे हा भूखंड भलत्याचाच असल्याचे सांगितले जात असल्याची तक्रार सीमा महाजन यांनी केली आहे. या प्रकाराने त्या तसेच मुले, जावई दहशतीत आहेत. आयुष्याचा एकमात्र आधार असलेला हा भूखंड हडपला जात असल्याची तक्रार त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे करूनही त्याची अद्यापही दखल घेतली गेली नसल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे.
हा भूखंड महाजन यांचाच असून त्यांनी दुसऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. मात्र, त्यांना धमकावले नाही किंवा कोणताही त्रास दिला नसल्याचे सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष काळसर्पे यांनी सांगितले.