गडकरींच्या समर्थनार्थ आज शेतकरी मेळावा Print

नागपूर / प्रतिनिधी
पूर्ती उद्योग समूहातील गुंतवणुकीवरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर उद्या, बुधवारी, ३१ ऑक्टोबरला विदर्भ शेतकरी शेतमजूर कृती समितीच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दुपारी १२ वाजेपासून विदर्भातील शेतक ऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांचा मुक्काम सध्या नागपुरात असला तरी ते या मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. गोपीनाथ मुंडेंची हजेरी लागणार असल्याचे म्हटले जात असले तरी याला दुजोरा मिळालेला नाही.  हा कार्यक्रम भाजपचा नसल्याने दोन्ही नेते अनुपस्थित राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
 इंडिया अंगेस्ट करप्शनने नितीन गडकरी यांच्यावर पूर्ती उद्योग समूहावरून आरोप केल्यानंतर उमरेड जिल्ह्य़ातील बेलासहीत भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी बेलामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेट घेतल्या. गेल्या चार- पाच वर्षांत पूर्ती साखर कारखान्यामुळे विदर्भातील अनेक ऊस उत्पादक शेतक ऱ्यांना रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतक ऱ्यांच्या मुलांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपामुळे उद्या चालून कारखाना बंद झाला तर आपल्या मुला-बाळांचे कसे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला.
नितीन गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांनी गडकरी यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पाठिशी असल्याची ग्वाही दिली. हिमाचल प्रदेशचा दौरा आटोपून गडकरी सोमवारी सकाळी नागपुरात आल्यावर विमानतळ परिसर आणि गडकरी वाडय़ाजवळ मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यात विदर्भातील शेतकऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात  होती.
नितीन गडकरी यांना जिल्ह्य़ातील भाजप कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असला तरी शेतक ऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. भंडारा, बेला आणि गोंदिया जिल्ह्य़ातील काही शेतक ऱ्यांनी संघटीत होऊन विदर्भ शेतकरी शेतमजूर कृती समिती स्थापन केली असून त्या समितीच्या माध्यमातून हा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यात समितीचे काही पदाधिकारी शेतकऱ्यांचे आणि युवकांच्या शंकाचे निरसन करणार आहे. हा मेळावा भारतीय जनता पक्षाने किंवा पूर्तीने आयोजित केला नसल्यामुळे दोन्ही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले.