दोन शाळकरी विद्यार्थिनींच्या आत्महत्यांनी नागपूर शोकाकूल Print

नागपूर / खास प्रतिनिधी
एका शाळकरी मुलीने घरातील न्हाणीघरातल्या शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वर्धमाननगरातील एस. कृपा पॅलेसमध्ये सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.अलिशा कन्हैयालाल बजाज हे त्या मुलीचे नाव असून ती विद्यानिकेतन शाळेत दहावीत शिकत होती. काल सायंकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आली. न्हाणीघरात गेली. बराचवेळ झाला तरी ती बाहेर का आली नाही, अशी शंका तिच्या आईला आली. तिने न्हाणीघराचे दार ठोठावले.
आतून प्रतिसाद न आल्याने तिच्या आईने कन्हय्यालाल यांना कळविले. त्यांनीही घरी आल्यानंतर न्हाणीघराचे दार ठोठावले. आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी लकडगंज पोलिसांना कळविले. पोलीस तेथे पोहोचले. न्हाणीघराचे दार महत्प्रयासाने उघडले असता अलिशाने गळफास घेतल्याचे दिसले. शॉवरला ओढनीने गळफास घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. तिची सराव परीक्षा सुरू आहे. परवा तिच्या आईने तिला अभ्यासाबद्दल विचारणा करीत अभ्यास कर असे बजावले होते. अलिशाच्या वडिलांचे धान्याचे दुकान असून तिला एक भाऊ व दोन बहिणी आहेत. पोलिसांनी घराची झडती घेतली. मात्र, सुसाईड नोट्स न मिळाल्याने तिने गळफास घेण्यामागील कारणांचा उलगडा झालेला नाही.
आत्महत्येची दुसरी घटना बेझनबागेत सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अभिलाषा विवेन पाटील (रा. एम्प्रेस मिल क्वार्टर) हे त्या मुलीचे नाव आहे. महात्मा गांधी हायस्कुलमध्ये नववीत शिकत होती. घरातील न्हाणीघरात लाकडी खांबाला तिने ओढणीने गळफास घेतला. जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सोमवारपासून तिची परीक्षा सुरू झाली. सकाळीच तिने आत्महत्या केल्याने त्यामागल कारणे स्पष्ट झालेले नाही. शाळेत एनसीसी कमांडंट असलेली अभिलाषा उत्कृष्ट नेमबाज होती. पुण्यात झालेल्या स्पर्धेत ती तिसऱ्या स्थानी होती. सकाळी ती आंघोळीसाठी न्हाणीघरात गेली. बराचवेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने बहिणींनी आवाज दिला तरी आतून प्रतिसाद मिळाला नाही.
व्हेंटिलेटरमधून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे दिसले. खिडकीतून आत शिरून न्हाणीघराचे दार उघडण्यात आले.
तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. दोन दिवसांपूर्वी दूरचित्रवाणीवरील एका मालिकेत गळफासाचे दृश्य तिने पाहिले. त्याबद्दल तिने बहिणींना विचारले.
यावरून तिला रागावले, असे पोलिसांना समजले.