अस्थमा पीडितांना मोफत औषध वितरणाचे ८५वे वर्ष Print

पोद्दारेश्वर ट्रस्टचा अखंड उपक्रम
नागपूर / खास प्रतिनिधी
सोमवारी रात्री शरद पौर्णिमेला शहरातील अनेक ठिकाणी नागरिक आटवलेल्या खास दुधाचा आस्वाद घेत असतानाच पोद्दारेश्वर राम मंदिरात जमलेले हजारो अस्थमा पीडित लोक भजन करीत खास औषधांचे सेवन करीत होते.
काल रात्री कोजागिरीनिमित्त नागरिकांनी इमारतींच्या गच्चीवर तर कुठे खुल्या मैदानात चंद्र प्रकाशात आटवलेल्या दुधाचा आस्वाद घेतला. कस्तुरचंद पार्कवर नागपूर सुधार प्रन्यासने सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली. पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरातही हजारो लोक जमले होते. कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी नव्हे तर केवळ चंद्रप्रकाशात तयार केलेल्या विशेष औषधांचे सेवन करण्यासाठी ही गर्दी होती. विविध सेवा कार्य करणाऱ्या पोद्दारेश्वर ट्रस्टतर्फे गेल्या ८५ वर्षांपासून कोजगिरीच्या रात्री नि:शुल्क औषध वितरण केले जाते. रामकृष्ण पोद्दार, सुरेश अग्रवाल तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यासाठी राबत असतात. विदर्भ, मध्यप्रदेशातून हजारो अस्थमा पीडित त्यासाठी सायंकाळी राम मंदिर परिसरात येत असतात. काल या कार्यक्रमासाठी वयोवृद्ध रामकृष्ण पोद्दार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश शर्मा, सुरेश अग्रवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते सायंकाळपासूनच मंदिर परिसरात आले होते. या सर्वानी या उपक्रमासंबंधी माहिती दिली.
मंदिराच्या मागील अंगणात पेटत्या गोवऱ्यांवर ३० नवे माठ ठेवण्यात आले होते. शंकरराव देवरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण गुंड यांच्यासह काही कार्यकर्ते खीर तयार करीत होते. पहाटे चार वाजेपर्यंत गाईच्या दुधापासून तसेच साखर न टाकता लाकडी चमच्याने ढवळून खीर तयार झाल्यानंतर त्यात जडीबुटींपासून तयार करण्यात आलेले औषध टाकून ती खीर केळीच्या पानांच्या द्रोणातून गरजूंना वितरित केली गेली. रात्रभर भजनाद्वारे ईश्वराचे नामस्मरण करीत हे औषध हजारोंनी प्राशन केले. हे खास औषध प्राशन करण्यापूर्वी काही पथ्ये पाळावी लागतात. त्यासंबंधी गरजूंना आधीपासून जाणीव करून देण्यात येते, असे यावेळी सांगण्यात आले.
दिवंगत जमनाधर बजाज यांच्या काळात अस्थमा पीडितांसाठी नि:शुल्क औषधे वितरणाचा उपक्रम सुरू झाला. एम्प्रेस मिलचे ते मुख्य वितरक होते. १९७९ मध्ये राम मंदिर व लागूनच शंकराचे मंदिर बांधण्यात आले. ८५ वर्षांपूर्वी चित्रकूटमधून एक महाराज आले होते. त्यांनी अस्थमा निवारणार्थ खास वनौषधींची माहिती देऊन गरजूंसाठी हा उपक्रम सुरू करण्याची सूचना केली. तेव्हापासून हा उपक्रम नि:शुल्क सुरू असल्याचे सुरेश अग्रवाल यांनी सांगितले. पोद्दारेश्वर मंदिरात दिल्या जाणाऱ्या या औषधाने लाभ होतो, असा प्रचंड विश्वास असल्याने दरवर्षी अनेक रुग्ण येथे येतात. गीता मंदिर तसेच वर्धमाननगरातही  औषधे वितरण केले जाते.
अनेकांना येथे येणे शक्य होत नसल्याने टपालाद्वारे औषधे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. औषधासाठी खीर कशी तयार करतात याबरोबरच पथ्ये कुठली पाळायची हे सांगितले जाते.