एफडीआयच्या समर्थनार्थ काँग्रेसची हस्ताक्षर मोहीम Print

नागपूर / प्रतिनिधी
केंद्र सरकारने किरकोळ व्यापारात परकीय थेट गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने हा विषय जनतेच्या दरबारात नेण्याच्या दृष्टीने देशव्यापी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून नागपुरात खासदार विलास मुत्तेमवार यांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ अलीकडेच  झाला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.  देवडिया भवनात शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात विरोधी पक्ष नेता विकास ठाकरे, आमदार दीनानाथ पडोळे उपस्थित होत.
या मोहिमेचा प्रारंभ करताना खासदार मुत्तेमवार म्हणाले, केंद्र शासनाने मल्टीब्रँड रिटेल (किरकोळ विक्री) क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीची परवानगी देणारा निर्णय शेतकरी, सामान्य ग्राहक, बेरोजगार व लघु उद्योजकांसाठी लाभकारी सिद्ध होणार आहे. तसेच शेतक ऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याची क्षमता असलेल्या या निर्णयाला नागरिकांनी समर्थन दिले पाहिजे. विरोधकांनी या विषयाबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवून लघु उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. एफडीआयच्या निर्णयामुळे विदेशी कंपनीला किमान ५५० कोटी रुपये एका प्रकल्पासाठी गुंतवणूक करावी लागेल व त्यातील ५० टक्के रक्कम पायाभूत सुविधांमध्ये साठवणुकीची गोदामे, शीतगृह, माल वाहतुकीचे साधने व सोयी यासाठी गुंतवावी लागेल. भारतातील १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ६० शहरांमध्ये ही गुंतवणूक करता येईल. केंद्र शासनाच्या अटीमुळे शेतकरी, लघुउद्योजक व लहान व्यापारी यांचा निश्चित फायदा होणार आहे आणि अल्पशिक्षत तरुणांना तसेच बेरोजगारांना यामुळे रोजगारांची संधी प्राप्त होईल, असेही मुत्तेमवार म्हणाले. जयप्रकाश गुप्ता म्हणाले, एफडीआयच्या समर्थनार्थ राबविण्यात येणाऱ्या या स्वाक्षरी मोहिमेत नागपूर १ लाख लोकांपर्यंत पोहचणार आहे. ही हस्ताक्षर मोहीम २ नोव्हेंबपर्यंत राबविण्यात येईल. पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व जनप्रतिनिधी यांच्यामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतीमालाला थेट बाजारपेठ मिळून दलालांचे उच्चाटन होईल, परिणामी शेतक ऱ्यांना चांगला भाव मिळेल तसेच ग्राहकांना माफक किंमतीत दर्जेदार वस्तू मिळतील शिवाय पायाभूत सुविधांची उभारणी होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असेही गुप्ता म्हणाले. कार्यक्रमाला रामगोविंद खोब्रागडे, योगेश तिवारी, तानाजी वनवे, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, उमेश शाहू आदी पदाधिकारी उपस्थित होते.