एलपीजी केवायसी फॉर्म भरण्याची मुदत १५ नोव्हेंबपर्यंत वाढविली Print

वर्षभरात एका कुटुंबाला सवलतीतील सहा सिलिंडर्स
नागपूर/प्रतिनिधी
एलपीजी गॅस सिलिंडरधारकांसाठी केवायसी (नो युवर कस्टमर) हा अर्ज भरून देण्याची मुदत आता १५ नोव्हेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना शोधून काढण्यासाठी हा अर्ज भरून घेतला जात असून यासाठी देशव्यापी मोहीम सुरू झाली आहे. यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आणखी १५ दिवस म्हणजे १५ नोव्हेंबपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वर्षभरात एका कुटुंबाला वर्षभरात सवलतीतील सहा सिलिंडर्स दिले जाणार असून ‘एक घर एक गॅस कनेक्शन’ धोरण अवलंबिले जाणार आहे. एका कुटुंबाकडे जर एकापेक्षा जास्त गॅस सिलिंडर असतील तर स्वेच्छेने काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवरा-बायकोच्या नावे असलेले वा एकाच पत्त्यावरील वेगळ्या नावाचे गॅस कनेक्शन आता रद्द केले जाणार आहे. केवायसी फॉर्ममध्ये ग्राहकाचे नाव, जन्मतारीख, पित्याचे नाव, आईचे नाव, पत्नीचे नाव, पिनकोडसह पूर्ण पत्ता आणि बँक खात्याची माहिती असे रकाने भरणे भाग आहे. एलपीजी कनेक्शनचे कुटुंबातील सदस्याच्या नावे हस्तांतरण विशिष्ट शर्तीवर दिले जाणार आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे गॅस कनेक्शन त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे केले जाणार आहे.
नवीन सवलतीतील सिलिंडर्स केवायसी अर्जाची औपचारिकता आणि एकापेक्षा अधिक गॅस कनेक्शन आहेत वा नाहीत, याची खात्री करून घेतल्यानंतरच दिले जाणार आहे. ग्राहकाला घरगुती स्वयंपाकाचे (नॉन-सबसिडाईज्झड्) सवलत नसलेले सिलिंडर घेण्यासाठी कोणतीही बंधने लादण्यात आलेली नाहीत.पुढील वर्षीच्या १ एप्रिलपासून एका वित्तीय वर्षांत सहा सवलतीतील गॅस सिलिंडर ग्राहकांना वितरित केले  जातील.