सोन्याचा भाव असलेली जमीन झाली कवडीमोलाची! Print

म्हाडाच्या नवीन चंद्रपुरातील जमीन आरक्षणाने भूखंड व्यावसायिक हादरले
नागपूर / प्रतिनिधी
नवीन चंद्रपुरातील दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली येथील ३१० एकर जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) आरक्षित केल्याने जमीन व्यावसायिकांना जबर धक्का बसला आहे. या भागात राजकारणी, कंत्राटदार, जमीन व्यावसायिक, मालगुजार, शैक्षणिक संस्थानिकांची सर्वाधिक जमीन असून कालपर्यंत सोन्याचा भाव असलेल्या या जमिनीची किंमत आता कवडीमोल झाली आहे.
आमच्या चंद्रपूरच्या प्रतिनिधीने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या शहरालगत दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली या भागात नवीन चंद्रपूर शहर विकसित करण्यात येत आहे. म्हाडा कॉलनी, व्यवस्थापन कॉलेज, डी.एल. बी.एड. पॉलिटेक्निक कॉलेज, तसेच प्रतिष्ठित कॉन्व्हेंट व विकसित होत असलेली औद्योगिक वसाहत याच भागात आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे यांचे खासगी हॉस्पिटल व इतर अनेक संस्थाही याच परिसरात येत असल्याने गेल्या दोन वर्षांत या भागातील जमिनीला सोन्याचा भाव आला होता. तीन वर्षांपूर्वीपर्यंत तीन ते चार लाख रुपये एकर असलेल्या जमिनीची किंमत ३० लाखापासून, तर ५० लाख रुपये एकपर्यंत पोहोचली होती. शंभर ते दिडशे रुपये फुटाने खरेदी केलेले प्लॉट आज ६०० ते ८०० रुपये दराने विकण्यात येत होते. अशातच म्हाडाने या भागातील रस्ते विकसित केल्याने सहा महिन्यात हा दर एक हजार रुपयांपर्यंत गेलेला होता. त्यामुळे जमीन विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या परिसरात जमीन असलेले कोटय़धीश झाले होते, परंतु म्हाडाने या परिसरातील ३१० एकर जमीन आरक्षित केल्याने सोन्याचा भाव असलेल्या जमिनीची किंमत एकदम कवडीमोल झाल्याने जमीन व्यावसायिकांना जबर धक्का बसला आहे.
म्हाडाने गृहनिर्माण कॉलनीसाठी पडोली या गावातील सव्‍‌र्हे क्रमांक ५८,५४,५२,४५,४१,४२,४३,५३,११,३३,२०,१८,२५ आरक्षित केले आहे, तर कोसारा गावातील सव्‍‌र्हे क्रमांक १२८,१३२,१३१ पासून, तर सव्‍‌र्हे क्रमांक ९० व ६५ पर्यंत जमीन तसेच याच गावालगतच्या खुटाळा येथील सव्‍‌र्हे क्रमांक ९५ पासून, तर ७२ पर्यंतची जमीन आरक्षित केली आहे. या आरक्षित जागेवर हाऊसिंग कॉलनीसोबतच म्हाडा बस स्थानक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, प्राथमिक शाळा, क्रीडांगण, पोलीस ठाणे, बगीचा, मार्केट, सांस्कृतिक सभागृह, स्मशानभूमी, म्हाडा कॉम्प्लेक्स यासाठीही जागा आरक्षित केली आहे. ज्या लोकांच्या जमिनी म्हाडाने आरक्षित केल्या त्यांना शासकीय दराने किंवा तीन वर्षांपूर्वी रजिस्ट्री झाली त्या दराने पैसे देण्यात येणार आहेत. या पध्दतीने जर जमिनीचे पैसे मिळाले तर एक कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीचे केवळ ३० ते ४० लाख रुपये मिळतील. त्यामुळे जमीन मालकांना तीन पट नुकसान सहन करावे लागणार आहे. म्हाडाने ३१० एकर जमीन आरक्षित केल्याची माहिती समोर येताच आपला सव्‍‌र्हे नंबर आरक्षित झाला काय, हे बघण्यासाठी जमीन व्यावसायिकांनी येथील म्हाडा कार्यालयात एकच गर्दी केली. विशेष म्हणजे, बहुतांश लोकांची जमीन आरक्षित झाली असून यात राजकीय नेत्यांसोबतच कंत्राटदार, जमीन व्यावसायिक, शैक्षणिक संस्थानिक, मालगुजारांच्या जमिनींचा सर्वाधिक समावेश आहे.
सोन्याचा भाव असलेल्या जमिनीचे कवडीमोल दराने पैसे मिळतील, हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
या भागात भविष्यात जमिनीचे दामदुप्पट भाव येतील म्हणून अनेकांनी फार्म हाऊस, प्लॉट स्कीम, रो-हाऊसेस तयार केली होती, मात्र ही जमीनही आरक्षित झाल्याचे माहिती होताच जमीन मालकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, काही मोजक्या लोकांची जमीन यातून वगळण्यात आलेली आहे.    

चौराळा व देवाडाचे भाव कडाडले
दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली येथील ३१० एकर जमीन आरक्षित होताच लगतच्या चौराळा व देवाडातीलही जमिनीचे भाव कडाडले आहेत. कालपर्यंत चौराळा व देवाडात १२५ रुपये फूट या दराने प्लाट विकण्यात येत होते. आज त्याचा दर २५० ते ३०० रुपये फुटावर गेला आहे. विशेष म्हणजे, चौराळा व देवाडा हे दोन्ही गावे महानगरपालिकेच्या हद्दीत नाहीत. त्यात १ नोव्हेंबरपासून पालिकेचा स्थानिक संस्था कर अर्थात, एलबीटी लागू होत असल्याने व्यापारी, जमीन व्यावसायिक व दलालांनी आपला मोर्चा या दोन गावांकडे वळविला आहे. त्यामुळे येथील जमिनीचे दर कडाडले आहेत.