‘रामझुला’ अधांतरी Print

नागपूर / प्रतिनिधी
मध्य भारतामध्ये झुलता पूल म्हणून नागपुरात रामझुला आकार घेत असताना गेल्या सहा वर्षांपासून शासकीय आणि राजकीय नेत्यांच्या दिरंगाईमुळे अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात अडकलेला हा महत्त्वाचा पूल नागपूरकराच्या वाहतूक समस्येचे ओझे पेलण्यापूर्वीच डोकेदुखी ठरला आहे. सध्यास्थितीत रामझुला प्रकल्प हा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.  
पोद्दारेश्वर मंदिर ते जयस्तंभ चौक चौकादरम्यान वैशिष्टय़पूर्ण रामझुला उभारण्यात येत आहे. गंगनचुंबी पायलॉनवर दोन्ही बाजूंनी केबलद्वारे पुलाची बांधणी हे या प्रकल्पाचे वैशिष्टय़ आहे. अशा प्रकारचा हा मध्यभारतातील पहिलाच पूल आहेत.
प्रत्येकी तीन पदराचे दोन पूल तयार करण्यात येणार असल्यामुळे त्यानुसार कामाची विभागणीही दोन टप्प्यात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात एका बाजूचे काम सुरू केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेला पूल तोडून दुसऱ्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.
मुंबईच्या अ‍ॅफकॉर्न इन्फ्रास्ट्रक्चरला कामाचे कंत्राट देण्यात आले. सुमारे ६० कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार होते. त्यातील ४६ कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात येणार होते तर उर्वरित खर्च रेल्वेतर्फे करण्यात येणार होता. या रामझुल्याच्या कामासाठी दरम्यानच्या काळात रेल्वेची परवानगी मिळविण्यात मोठा काळ गेला.
२००६ मध्ये प्रत्यक्ष या कामाला प्रारंभ करण्यात आल्यानंतर ४२ महिन्यात दोन्ही पूल तयार करणे अपेक्षित होते आणि तसे आदेश शासनाने दिले होते. मात्र वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे आणि प्रशासकीय कामाच्या दिरंगाईमुळे काम लांबले.
मान्यतेसाठी डिझाईनमध्ये करावा लागलेला बदल, वाढत जाणाऱ्या बांधकाम साहित्याच्या किमतीचे कारण पुढे करून कंत्राटदार कंपनीने गेल्या दीड वर्षांपासून काम बंद केले आहे.
काम सुरू होऊन जवळपास सहा वर्षांंचा काळ लोटला असताना केवळ ३० ते ३५ टक्के काम झाले असले तरी पहिल्या टप्प्याचे ६२ टक्के काम झाले असल्याचा दावा रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आला. झालेल्या कामासाठी कंत्राटदार कंपनीला आतापर्यंत १७ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात आले.  दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रामझुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर केबलमुळे काम रखडण्यात आल्याचे सांगितले होते. तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाला सातत्याने उशीर होत असल्यामुळे कंत्राटदार कंपनीला दोनदा मुदतवाढ दिली मात्र कंपनीला त्याचा उपयोग करून घेता आला नाही. तिसऱ्यांदा मुदत देण्यात आल्यानंतर ती सुद्धा संपली असून गेल्या दीड वर्षांपासून काम बंद करण्यात आले आहे.  
पुलाचे आणि त्यावरून होणाऱ्या रहदारीचे वजन पेलू शकेल यासाठी विशिष्ट प्रकारच्या मजबूत केबलची आवश्यकता आहे.एका पुलाला ५४ केबल लागणार आहे. हे केबल दक्षिण आफ्रिकेतील एका कंपनीकडून मागवण्यात आले होते. त्यांच्याशी करार करून त्याची मागणी करण्यात आली होती मात्र ती कंपनीच केबलचा पुरवठा करू शकली नाही. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून केवळ केबलमुळे काम रखडले असल्याचे सांगितले जात आहे.
जपानच्या एका कंपनीला ऑर्डर देण्यात आली असून त्यास महामंडळाचे अधिकारी हुमणे यांनी दुजोरा दिला आहे. पुलाचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे रखडले असले तरी सध्यास्थितीत ते रामभरोसे आहे.