कोरडवाहू शेतीसाठी १० हजार कोटींचे अभियान Print

कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
नागपूर / प्रतिनिधी
कोरडवाहू शेतीत शाश्वत सिंचनासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे विशेष अभियान राबवण्यात येणार असून त्याची रूपरेषा तयार झाली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ६९ शेतकऱ्यांना येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी कृषी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल के. शंकरनारायणन हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आदी उपस्थित होते.  मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी नागपूरच्या अधिवेशनात कापूस, सोयाबीन आणि धानासाठी २ हजार कोटी रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले होते. अशा प्रकारचे अनुदान खर्च होऊन जाते, पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजेत. त्यासाठी सूक्ष्म सिंचनावर अधिक भर दिला जाणार आहे. कोरडवाहू शेतीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार १० हजार कोटी रुपयांचे विशेष अभियान राबवणार आहे.  शेतकरी आत्महत्यांचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी शाश्वत शेती नाही. शेतकऱ्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या हाती काही पडत नाही. सिंचनाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या भागात सुरक्षित सिंचनासाठी उपाययोजना कराव्या लागतील. ठिबक व तुषार सिंचनासाठी पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे.  सिंचनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात उपलब्ध असलेल्या निधीतून सिंचन प्रकल्प कशा पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ज्या धरणांची कामे ७५ ते ८० टक्के पूर्ण झाली आहेत त्यांना प्राथमिकता देण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, अवर्षणप्रवण भागासह विदर्भातील खारपाणपट्टा, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये एका वर्षांत पूर्ण होऊ शकणाऱ्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडे बावीसशे कोटी रुपयांचे पॅकेज मागण्यात आले आहे. पंतप्रधानांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी आपली चर्चा झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात किरकोळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचे समर्थन केले. एफडीआयचा लाभ थेट शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहे. लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे. देशासमोर अन्न सुरक्षेचे मोठे आव्हान आहे. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार आहे. शेतीमध्ये ज्ञान व व्यवस्थापन यांची सांगड घालून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक सजगपणे काम करावे लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी पुरस्कारांच्या संदर्भातील भूमिका मांडली. शेतीत नवनवीन प्रयोग राबवून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली यशोगाथा सिद्ध केली आहे. इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, शेती अधिक विकसित व्हावी, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार अनेक उपक्रम राबवित आहे, असे विखे पाटील म्हणाले. गुलाबराव देवकर यांनी आभार मानले.
कृषी क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भरवनाथ ठोंबरे आणि सोलापूर जिल्ह्य़ातील आनंद कोठाडिया यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्यासह राज्यातील ६९ प्रयोगशील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.  कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, डॉ. अनिल बोंडे, रवी राणा, केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, कृषी आयुक्त उमाकांत दांगड, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते.