दिवसाढवळ्या ऑटो अडवून ९० लाखांचे दागिने लुटले Print

उपराजधानी असुरक्षित
खास प्रतिनिधी/नागपूर ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
मोटारसायकलवर आलेल्या तीन लुटारूंनी चाकूचा धाक दाखवून ऑटो रिक्षातील कुरिअरच्या कर्मचाऱ्यासह दोघांना लुटल्याची घटना गजबजलेल्या जयस्तंभ चौकात मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली. लुटारूंनी पळविलेल्या बॅगांमध्ये नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने (किंमत ८९ लाख ८२ हजार रुपये) होते.
प्रदीप विश्वनाथ बिघे (रा. अमरावती) हे मुंबईच्या खंडेलवाल लॉजिस्टिक कुरिअर कंपनीत कर्मचारी आहेत. काल मुंबईहून सोन्या-चांदीचे दागिने असलेले पार्सल घेऊन विदर्भ एक्सप्रेसने निघाले. आज सकाळी ते नागपूरला आले. त्यांच्यासोबत महेश बी. सिंह (मुंबई) हे प्लायवूड व्यापारी होते. ते दोघेही दोन काळ्या बॅग व एक सुटकेस घेऊन रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दाराने बाहेर आले. तेथून त्यांनी जलालपुरामध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्षा (एमएच/३१/१५३३) ठरवला. रमेश जनार्दन गुळंकवार (रा. कुशीनगर) हा ऑटो रिक्षा चालक त्यांना घेऊन निघाला. जलालपुरामध्ये खंडेलवाल लॉजिस्टिकचे कार्यालय आहे. ऑटोरिक्षा जयस्तंभ चौकातून गांधीबागकडे जाण्यासाठी उजवीकडे पुलावर वळत असतानाच ऑटोरिक्षाच्या डाव्या व उजव्या बाजूने मोटारसायकली आल्या. समोरही एक मोटारसायकल होती. उजवीकडील मोटारसायकल चालक ऑटोरिक्षाला डावीकडे दाबू लागला. रस्ता दुभाजकाजवळ ऑटो रिक्षा थांबविण्यास त्यांनी भाग पाडले.
दोन्हीकडील मोटारसायकलीवरून दोघे उतरले. अश्लील शिवीगाळ त्यांनी सुरू केली. डावीकडील तरुणाने हातातील चाकूचा धाक दाखवित ‘चुपचाप बैठो बाहर मत निकलना’ अशी दमदाटी केली. डावीकडील व उजवीकडील लुटारूंनी बॅगा ओढल्या. बिघे व महेशसिंह यांनी त्या धरून ठेवल्या. मात्र, दोन्ही लुटारूंनी त्या खेचल्या. महेशची ट्रॉली असलेली सुटकेस व बिघेंची एक बॅग खेचून लुटारू मोटारसायकलवर बसले आणि रेल्वे उड्डाणपुलावर पळाले. त्यापैकी एका होंडा मोटारसायकल (एमएच/३१/टीसी/२३२) नवी कोरी होती. अवघ्या एक मिनिटात ही घटना घडली. घाबरलेले ऑटोरिक्षा चालक, बिघे व महेश भानावर आले आणि ‘चोर चोर’ असे ओरडत लुटारूंच्या मागे ऑटोरिक्षाने निघाले. लुटारू पुलावरून डावीकडे गार्ड लाईनकडे वेगात पळून गेले. या तिघांनी रेल्वे पोलीस ठाणे गाठले. रेल्वे पोलिसांनी त्यांना सदर पोलीस ठाण्यात पाठविले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजरत्न बन्सोड यांनी तातडीने ही घटना वरिष्ठांना कळविली आणि ते जयस्तंभ चौकात पोहोचले. शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त बैठक घेत होते.
ही घटना समजताच पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवदे, पोलीस उपायुक्त मंगलजित सिरम, सहायक पोलीस आयुक्त अनंत सराफ यांच्यासह पोलिसांची ताफाही पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. तक्रारकर्त्यांकडून त्यांनी घटनाक्रम जाणून घेतला. सदर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अनंत बिघे यापूर्वी मधुर कुरिअर्समध्ये होते.  
गेली ३२ वर्षांपासून ते कुरिअर क्षेत्रात आहेत. खंडेलवाल लॉजिस्टिकमध्ये त्यांना १८ महिने झाले आहेत. महेशसिंह प्लायवूड विक्री, खरेदीसंबंधी आठवडय़ाला नागपुरात येत असतात. बिघे यांनी सोन्या-चांदीचे दागिने (किंमत ८९ लाख ८२ हजार रुपये) असलेले पार्सल आणले होते. मुंबईत दागिने तयार करून नागपूरचे व्यापारी रोज दागिने कुरिअरने नागपुरात बोलावतात.
या घटनेने खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी आग्यारामदेवी चौकात एका मेणबत्ती व्यापाऱ्याला डोळ्यात तिखट फेकून लुटले होते. काही महिन्यांपूर्वी रमण विज्ञान केंद्राजवळ गोळीबार करीत दोघांना लुटण्यात आले होते.
अजनी चौकातून ऑटोरिक्षातून जात असलेल्या बँक कर्मचाऱ्यांना लुटण्यात आले. या  घटनांचा तपास अद्यापही लागलेला नाही. आज सकाळी जयस्तंभ चौकात वर्दळ असतानाही एका मिनिटात लुटण्यात आले. जयस्तंभ चौकाजवळ तसेच पोद्दारेश्वर राम मंदिराजवळ प्रत्येकी दोन वाहतूक पोलीस तैनात होते. तरीही ही घटना घडल्याने लुटारूंची हिंमत वाढली असल्याचे उघड झाले.     

भूखंड व्यावसायिकाचे ३० लाखांचे दागिने लुटले
मोटारसायकलवर आलेल्या दोन लुटारूंनी एका भूखंड व्यावसायिकाच्या हातातील तीस लाखांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना उत्तर नागपुरातील चॉक्स कॉलनीत मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. भूखंड व्यावसायिक शरद कृष्णकांत वर्मा (रा. चॉक्स कॉलनी) हे दुपारी त्यांच्या नॅनो कारने (एमएच/३१/डीव्ही/९५२९) श्रीमोहिनी कॉम्प्लेक्समधील महिंद्र कोटक बँकेत गेले होते. तेथील लॉकरमधून त्यांनी सोन्याचे दागिने (किंमत ३० लाख ६ हजार ७८३ रुपये) काढले. एका पॅकेटमध्ये ठेवून ते कारने घरी आले. एका हातात पॅकेट घेऊन ते कारमधून उतरले आणि तिला कुलूप लावित असतानाच मागून एका मोटारसायकलवर दोघे आले. त्यांनी शरद वर्मा यांच्या हातातील पॅकेट हिसकावून ते पळून गेले. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.