पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून Print

मोतीबागेतील घटना, सहा आरोपींना अटक
नागपूर / खास प्रतिनिधी
जुन्या भांडणातून सहाजणांच्या टोळक्याने चाकूचे घाव घालून एका तरुणाचा खून केला. बुधवारी रात्री मोतीबाग रेल्वे फाटकाजवळील झोपडपट्टीत घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली. राकेश राजूसिंह ठाकूर हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राकेश, त्याचे साथीदार आणि आरोपी सद्दाम यांच्यात भांडणे सुरू आहेत. काल रात्री मोतीबाग रेल्वे फाटकाजवळून राकेश जाताना दिसल्याने आरोपी सद्दाम कुरेशी शफी कुरेशी, शिवचरण सेवकराम भिमटे, मोहम्मद समीर मोहम्मद शकुर, मोहम्मद शाहरुख मोहम्मद शकुर व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी धावपळ करून त्याला गाठले. त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. सद्दाम व त्याच्या टोळक्याने राकेशला बेदम मारहाण करीत चाकूचे वार घातले. पोट, छाती व गळ्यावर घाव बसल्याने राकेश कोसळला. राकेशला मारहाण सुरू असताना वस्तीमधील इतर लोक धावले. मात्र, आरोपींच्या हातातील चाकू पाहून कुणाची समोर येण्याची हिंमत झाली नाही. पाचपावली पोलिसांचे वाहन जवळच गस्त घालत होते. त्यांना ही घटना समजताच अवघ्या काही मिनिटात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ जरीपटका पोलीसही येऊन पोहोचले. पोलिसांनी राकेच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत रात्रभरात धावपळ करून सद्दाम कुरेशी शफी कुरेशी, शिवचरण सेवकराम भिमटे, मोहम्मद समीर मोहम्मद शकुर, मोहम्मद शाहरुख मोहम्मद शकुर या आरोपींना अटक केली. त्यांच्या दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०११ या काळात नागपूर शहरात ११२ खुनाच्या घटना घडल्या. गेल्या महिन्यात मानेवाडा मार्गावरील सराफा दुकानदार मोंटू ठवकर, कुख्यात आरोपी इक्बाल, दोन दिवसांपूर्वी बंडू मोहोड यांचा खून झाला. खुनाच्या घटनांनी यावर्षी पंचाहत्तरी पार केली असून गुन्हेगारांना कुणाचाही धाक राहिलेला नसल्याने शंभरी गाठली तरी त्यात आश्चर्य राहणार नाही.
पोलिसांनी यावर्षी कुख्यात गुन्हेगार शेख शकील पिर मोहम्मद (रा. संघर्षनगर झोपडपट्टी) व रवी निरंजन खंडारे (रा. देशपांडे लेआऊट) यांच्यासह ११२ गुन्हेगारांना हद्दपारकेले. कुख्यात गुन्हेगार राजू उर्फ भिक्कू रामभाऊ परचाके (रा. रामबाग) याच्यासह नऊ गुन्हेगारांवर एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करण्यात आले. असे असले तरी खुनाच्या
घटना घडतच आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांना धाक उरलेला नाही, हे वास्तव आहे.