पुरोगामी साहित्याला बळ मिळण्याची आशा Print

डॉ. कोतापल्लेंच्या निवडीचे विदर्भात स्वागत
नागपूर /प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उडवण्यात आलेल्या धुराळा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निवडीमुळे शांत झाला असून त्यांच्या विजयामुळे पुरोगामी साहित्य जननिष्ठ होण्याच्या दृष्टीने बळ मिळेल, अशा स्वागतपर प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून ‘लोकसत्ता’कडे व्यक्त करण्यात आल्या.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर म्हणाले, अध्यक्षांची निवडणूक ही साहित्याच्या संकुचित वलयात अडकली आहे, अशी ओरड होत असताना कोत्तापल्ले यांची निवड जात, धर्म यांना ओलांडून गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे. ते ग्रामीण, पुरोगामी साहित्य चळवळींचे कार्यकर्ते आणि पुरस्कर्ते असून त्यांचे लिखान त्यावर आधारित आहे.
ज्येष्ठ साहित्यिक-कवी यशवंत मनोहर म्हणाले, अनुमोदन दिल्यानंतर डॉ. कोत्तापल्ले निवडून येणे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. जीवननिष्ठा जपणारा आणि बहुजन समाजाच्या भावना साहित्यातून आणि समीक्षेतून त्या भावनेला मुखरित करणारे माझे मित्र डॉ. कोत्तापल्ले निवडून आले आहेत. त्यांच्या निवडून येण्याने मराठी साहित्यातील उपेक्षित बहुजन, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन यांचा स्वर अध्यक्षीय भाषणातून बुलंद होऊ शकेल आणि तो व्हावा, अशीच अपेक्षा आहे. मराठी साहित्य जननिष्ठ होण्याच्या दृष्टीने त्यांच्या अध्यक्षीय निवडीला अधिक बळ मिळू शकेल, अशी खात्री वाटते.
ज्येष्ठ समीक्षक डॉ. आशा सावदेकर म्हणाल्या, आम्ही कोत्तापल्लेंनाच महत्त्व दिले होते. कुलगुरूंबरोबरच एक प्रशासक म्हणूनच त्यांनी जबाबदारी पेलली आहे. आधुनिक काळात मराठी बद्दलची आत्मीयता कशी विस्तारली किंवा खोल गेली, याचा अंदाज त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून कळू शकेल.
ज्येष्ठ संपादक-साहित्यिक सुरेश द्वादशीवार म्हणाले, कवी, कथाकार, कादंबरीकार आणि गंभीर वैचारिक लेखन करणारे अभ्यासू लेखक असलेले डॉ. कोत्तापल्ले माझे दीर्घकाळचे स्नेही आहेत. उत्तम वक्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला आहे. ते त्यांच्या मतांबद्दल आग्रही असले तरी ते अतिशय विनयशील लेखक आहेत. असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची अध्यक्षपदी निवड ही बाब संमेलनाध्यक्ष परंपरेचा गौरव वाढवणारी आहे.
मार्क्‍स आणि आंबेडकरवादी लेखक डॉ. वि.स. जोग म्हणाले, एक पुरोगामी विचारांचा आणि विचारांच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी मानणारा लढवय्या गंभीर वृत्ती जपणारा लेखक अध्यक्ष झाला याचा आनंद आहे. त्यांना जी सत्तापदे मिळाली. त्याचा त्यांनी योग्य विनियोग केला. त्यांच्या अनुभवाचा उपयोग ते संमेलनाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत करतील, अशी अपेक्षा आहे.
ज्येष्ठ कवी डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, लागोपाठ तीनवर्षे संमेलनाच्या अध्यक्षपदी भूमिका घेणाऱ्या प्रगतिशील लेखकाची निवड होणे हे महाराष्ट्राच्या प्रागतिक सांस्कृतिकतेचे लक्षण आहे. डॉ. कोत्तापल्ले मराठी वाङ्मयातील एका वेगळा प्रवाह आहे आणि तो प्रवाह हाच मुख्य प्रवाह झाल्याचे लक्षण आहे.
डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, डॉ. कोत्तापल्ले हे पुरोगामी विचारांचे ललित लेखक आणि विचारवंत म्हणून सुपरिचित आहेत. पुरोगामी साहित्यिक आणि सामाजिक चळवळींमधील त्यांचा
सहभाग नेहमीच सक्रिय राहिलेला आहे. साहित्य संस्थांच्याही संदर्भात त्यांचे काम अतिशय उठून दिसणारे आहे. साहित्याच्या क्षेत्रात कथा, कादंबरी, समीक्षा, ललितबंध चरित्र आणि वैचारिक लेखन यामध्येही त्यांनी विपुल आणि गुणवत्तापूर्ण लेखन केले आहे. समकालीन वाङ्मय आणि सामाजिक प्रश्न यासंदर्भात कोत्तापल्ले अध्यक्षीय भाषणातून वेध घेतील, अशी अपेक्षा आहे.
प्रकाशक अरुणा सबाने म्हणाल्या, कोत्तापल्लेंची निवड ही पुरोगामी विचारांचा विजय आहे. त्यांच्या भाषणातून मराठी, तिचे संवर्धन आणि एकंदरीत साहित्य यावर नवीन वैचारिक मेजवानी मिळणार याबद्दल शंका नाही.