सीआयडीचा कारभार अधीक्षकांविना Print

नागपूर, अमरावती विभाग पोरका
किरण राजदेरकर / नागपूर
राज्य गुन्हे अन्वेषण खात्याच्या (सीआयडी) विदर्भातील नागपूर व अमरावती विभागाचा कारभार अधीक्षकाविना सुरू असून पोलीस दलाच्या कारभाराचे ‘वास्तव’ यातून समोर आले आहे.  राज्य गुन्हे अन्वेषण खात्याच्या (सीआयडी) नागपूर विभागात अधीक्षकासह २१ अधिकाऱ्यांची गृह खात्याने अद्यापही नियुक्ती केलेली नाही. अतिगंभीर व महत्त्वाच्या प्रकरणांचाच तपास ‘सीआयडी’कडे सोपविला जातो. नागपूर शहरातील अनंत सोनी खून, पोलीस निरीक्षक ए. पिरजादे यांच्यावरील झालेले अत्याचाराचे आरोप आदी विविध प्रकरणांचा तपास ‘सीआयडी’च्या नागपूर विभागाकडे आहे.
नागपूर शहरासह, नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आदी सहा जिल्हे ‘सीआयडी’च्या नागपूर विभागाच्या अखत्यारित येतात. सध्या केवळ तीन अधिकाऱ्यांच्या भरवशावर या विभागाचे काम सुरू आहे. एक पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नऊ उपअधीक्षक आणि नऊ पोलीस निरीक्षक एवढी एकवीस अधिकाऱ्यांची पदे या विभागात रिक्त आहेत. पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी उत्तर प्रदेश मंत्रालयात जाण्याची विनंती केल्याने त्यांना तशी परवानगी देण्यात आली. ऑगस्टमध्ये ते रवाना झाले. त्यानंतर दोन महिन्यांपासून या विभागात एकाही पोलीस अधीक्षकाची नियुक्ती झालेली नाही.  
एका उपअधीक्षकाकडे अतिरिक्त अधीक्षक व अधीक्षकाचा प्रभार आहे. केवळ नागपूरच नव्हे तर अमरावती विभागातही अधीक्षक पद रिक्त आहे. अमरावती शहरासह अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशीम, अकोला व बुलडाणा आदी पाच जिल्हे ‘सीआयडी’च्या अमरावती विभागात येतात.
आर.आर. पाटील गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांचा भर केवळ त्याच जिल्ह्य़ावर आहे. मात्र, ‘सीआयडी’सारख्या महत्वपूर्ण विभागाात अधीक्षकासह तब्बल २१ पदे रिक्त राहण तपासाच्या दृष्टीने अडथळे निर्माण करणारे आहे. २६/११च्या घटनेनंतर पोलीस खाते अत्याधुनिक करण्याच्या मंत्र्यांच्या घोषणेचे ‘वास्तव’ दर्शविणारे हे चित्र आहे.