सवलतीच्या गॅसचा असाही गोरखधंदा Print

प्रामाणिक ग्राहकांना फटका बसण्याची चिन्हे
सचिन देशपांडे  
एका घरात सहा गॅस सिलिंडर सबसिडीच्या दरात देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. या निर्णयानंतर काही गॅस वितरकांनी योग्य अशा ग्राहकांचे गॅस सिलिंडर विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या गॅस विक्रीमुळे थेट संबंधित योग्य ग्राहकांची सबसिडी चोरीला जात आहे. यात मोठय़ा प्रमाणात गॅस वितरक थेट गुंतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे एखाद्या ग्राहकांची सबसिडी चोरणाऱ्या गॅस वितरकांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई आवश्यक झाली आहे. अन्यथा, ग्राहक उपाशी राहून वितरक तुपाशी खातील.
सहा गॅस सिलिंडरवर सरकार सबसिडी देणार आहे. त्यापुढील गॅस सिलिंडर हे बाजारभावाने विकत घ्यावे लागेल. या निर्णयानंतर मोठय़ा प्रमाणात ग्राहकांकडून केवायसी अर्ज भरून घेण्यात आले. गॅस कनेक्शन दुसऱ्याच्या नावाने वा बोगस कनेक्शन असलेल्या ग्राहकांची यामुळे मोठी पंचाईत तूर्तास झाली आहे. सरकारच्या केवायसी धोरणामुळे बोगस ग्राहक उघडकीस आले. बोगस गॅस ग्राहक तयार करण्यात काही गॅस वितरकांची भूमिका संशयास्पद आहे. गॅस वितरकांनी मोठय़ा प्रमाणात बोगस कनेक्शन गेल्या काही वर्षांत वितरित केल्याने आता या ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. अडचणीत असलेल्या बोगस ग्राहकांचा रोष कमी व्हावा, या उद्देशाने काही वितरकांनी योग्य ग्राहकांच्या कोटय़ातील सबसिडीवरील गॅस विक्रीचा गोरखधंदा सुरू केला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या माध्यमातून संबंधित योग्य ग्राहकांला सबसिडीवर मिळणाऱ्या सिलिंडरच्या संख्येत घट होणार आहे. अशा योग्य ग्राहकाच्या हक्कांची सबसिडी ही बोगस ग्राहकाला देण्यात येईल. त्यामुळे योग्य ग्राहकाला जादा पैसे देत बाजारभावानुसार सिलिंडर घ्यावे लागेल. त्याच वेळी बोगस ग्राहक देखील अतिरिक्त पैसे देत वितरकांकडून गॅस सिलिंडर विकत घेईल. या सर्व प्रक्रियेत बोगस व योग्य हे दोन्ही ग्राहक वेठीस धरले जाणार आहेत तर, वितरकांना मोठय़ा वरकमाईचे हे साधन उपलब्ध होणार आहे.
योग्य ग्राहकांची सबसिडी वितरक चोरणार असून ती थांबविण्याची गरज आहे, अशा प्रकारे वितरक गॅस सिलिंडरच्या विक्रीतून चोरी करत आहे काय, याची खातरजमा प्रत्येक ग्राहकाने करावी. नव्या नियमानुसार गॅस वितरण झाल्याची माहिती आता सर्व ग्राहकांना संबंधित ऑईल कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाईन मिळते. या ऑनलाईन प्रक्रियेत ग्राहकांनी गेल्या वर्षांत व सद्यपरिस्थितीत किती सिलिंडर बुक केले व कितीचे वितरण झाले, किती सबसिडी ग्राहकाला देय आहे याची माहिती उपलब्ध केली आहे. ग्राहकाने सिलिंडर बुक न करता अशा एका प्रकरणात वितरकाने संबंधित ग्राहकाचे सिलिंडर दुसऱ्यालाच विकल्याची बाब उघड झाली आहे. ज्या ग्राहकांना ऑनलाईन सिलिंडर बुकिंगची पध्दत ज्ञात नाही, अशा ग्राहकांनी वितरकांकडे त्यांच्या क्रमांकावर किती गॅस सिलिंडरची उचल झाली, याची खातरजमा करावी.
योग्य ग्राहकांची सबसिडीची चोरी करणे व इतरांना हेच सबसिडीवर मिळणारे सिलिंडर चढय़ा भावाने विकण्याचा दुहेरी फायदा वितरक घेणार आहे. नव्या पध्दतीनुसार सर्व ग्राहकांना केवळ तीन सिलिंडर मार्च अखेर पर्यंत सबसिडीवर मिळणार आहे. हा कोटा दुसऱ्यासाठी वापरण्याचा प्रयत्न गॅस वितरक करण्यात गुंग आहेत. याचा सर्वाधिक फटका योग्य ग्राहकांना येत्या काळात बसण्याची चिन्हे आहे. गॅस वितरणात वितरकांची मनमानीची दखल सर्वच ऑईल कंपन्या व पुरवठा विभागाने घेण्याची गरज आहे. तसेच सबसिडीची चोरी करणाऱ्या वितरकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.