झाडीपट्टीची उलाढाल पहिल्यांदाच ३०० कोटींवर Print

कलावंतांना सहा महिने रोजगार
दिलीप शेळके/ नागपूर
शासनाकडून अनुदान न घेता खंबीरपणे वाचचाल करीत असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीने विदर्भातील कलावंतांना सहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अलीकडच्या काळात व्यावसायिक स्वरूप आलेल्या या रंगभूमीवर चार महिन्यांच्या एका हंगामात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने कलावंतांसाठी ही रंगभूमी मोठी लाभदायी ठरली आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्य़ांसह मध्य प्रदेशातील काही भाग तसेच नागपूर जिल्ह्य़ातील काही भागांचा झाडी भाषक प्रदेशात समावेश होतो. दिवाळीच्या तोंडावर नाटय़ रसिकांना झाडीपट्टी रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांची ओढ लागली आहे.
दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर सादर होणाऱ्या प्रयोगांसाठी नाटय़ संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे. काही नाटय़ संस्था यावर्षी प्रथमच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असून आगळ्या नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
रसिकही नाटकांना तेवढय़ाच उत्स्फूर्तपणे दाद देत असल्याने कलावंतांचा उत्साह टिकून आहे. यावर्षी १५ नोव्हेंबरपासून (भाऊबीज) या रंगभूमीवर नाटय़प्रयोग सादर होणार आहेत.  दिवसा दंडारी तर रात्री नाटक असा कार्यक्रम मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
सिंदेवाही येथील ‘चंद्रकमल थिएटर’ यावर्षी सात नाटकांचे प्रयोग सादर करणार आहे. दिवाळीपासून झाडीपट्टीत मंडई भरते. गावागावांमध्ये देवीची यात्रा भरते. यानिमित्त वेगवेगळ्या गावांतील लोक येतात. त्यांच्या मनोरंजनासाठी ही नाटके सादर केली जातात. यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही.
झाडीपट्टीवरील नाटय़ संस्था स्वत:च संपूर्ण खर्च करून नाटक सादर करतात. ‘चंद्रकमल’मध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ांतील कलावंत असून रसिकांचा नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी शेखर डोंगरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
वडसा ही झाडीपट्टी रंगभूमीची पंढरी आहे. गडचिरोली, नवरगाव, सिंदेवाही, नागपूर आणि इतर ठिकाणच्या जवळपास  ४० नाटय़ संस्था १३०० ते १४०० नाटय़ प्रयोग सादर करणार आहेत. या नाटकांमध्ये स्थानिक कलावंतांचाच मोठा सहभाग असतो.  राजसा नाटय़ कला रंगभूमी ही संस्था यावर्षी शंभर ते सव्वाशे प्रयोग सादर करणार आहे. या नाटय़ प्रयोगांचे बुकिंग झाले आहे. रसिकांनीच ही रंगभूमी उचलून धरली आहे म्हणून सरकारची मदत नसतानाही आज चांगल्या स्थितीत उभी आहे, असे झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते देवेंद्र लुटे यांनी सांगितले. रसिकांना काही वेगळे देण्याच्या हेतूने वडसा येथील प्रल्हाद नाटय़ रंगभूमी यावर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘शिदोरी’, ‘मजुरी’, ‘सरणावरची लाकडं’, ‘भरारी’ व ‘फाटका पदर मायेचा’ ही नाटके सादर करणार आहे. अभिनय नाटय़ संपदामार्फत यावर्षी तीन नाटके सादर केली जाणार आहेत.