प्रतिमा सावरण्यासाठी गडकरींना शक्तिप्रदर्शनाचा आधार Print

नागपूर / खास प्रतिनिधी
चोहोबाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांपासून स्वत:ला सावरण्यासाठी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी शक्तिप्रदर्शनाचा आधार घेतला आहे. स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जागोजागी शक्तिप्रदर्शन करून आपल्या पाठिशी व्यापक जनसमर्थन असल्याचे चित्र उभे करण्याचा गडकरींचा प्रयास सुरू झाला असला तरी महाराष्ट्र भाजपातील पहिल्या फळीचे नेते गडकरींसोबत असल्याचे चित्र कुठेच दिसलेले नाही. हिमाचल प्रदेश, गुजरातेतील ऐन तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि कर्नाटक, राजस्थानातील अंतर्गत पेचप्रसंग अशा कोंडीत सापडलेल्या गडकरींनी स्वत:ची प्रतिमा जपण्याला सर्वोच्च महत्त्व दिल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
इंडिया अगेंन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्य केल्यापासून गडकरी चांगलेच कोंडीत सापडले आहेत. केजरीवाल आणि अंजली दमानियांनी गडकरींवर शेतक ऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आणि सिंचनाचे पाणी पळविल्याचा पहिला घाव घातला. यातून सावरण्यासाठी गडकरींना त्याच दिवशी पत्रकार परिषदेत साऱ्या आरोपांचे खंडन करून बाजू सावरली. मात्र, नंतर पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडमधील गुंतवणुकीवरून ‘मिडिया ट्रायल’ सुरू होताच चोहो आघाडय़ांवर लढण्यासाठी गडकरींची कसरत सुरू झाली. संघाचे पाठबळ असल्याचे उभे झालेले चित्र आणि लालकृष्ण अडवाणींसह पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी उचलून धरलेली बाजू यामुळे गडकरींची एक बाजू वरवर भक्कम वाटत असली तरी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली प्रतिमा सावरण्यासाठी गडकरींनी शक्तिप्रदर्शनाचे अस्त्र उपसले.  
हिमाचल प्रदेशातील निवडणूक प्रचार दौरा अर्धवट टाकून सोमवारी नागपुरात परतलेल्या गडकरींचे सोनेगाव विमानतळ आणि महालमधील वाडय़ाजवळ अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. गडकरी समर्थकांच्या शक्तिप्रदर्शनाची ही पहिली झलक होती. हा घाट अचानक घालण्यात आला, याची कल्पना स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आली आणि सकाळपासून दुपापर्यंत भाजप कार्यकर्त्यांचा एक मोठा गट गडकरींसाठी राबत राहिला. वाडय़ासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना आरोप करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर लढाईचे रणशिंग फुंकत गडकरींनी त्यांच्यावरील साऱ्या आरोपांचे स्पष्टीकरण दिले. शक्तिप्रदर्शनाच्या पहिल्या प्रयत्नाला आलेले यश लक्षात घेऊन गडकरी समर्थक शेतक ऱ्यांनी बुधवारी रेशीमबाग मैदानावर भव्य रॅली घेतली. या रॅलीत भाजपचे पहिल्या फळीतील नेते अनुपस्थित होते. वास्तविक ही भाजपने आयोजित केलेली रॅली नव्हती. परंतु, गडकरींनी दिलेल्या आदेशानुसारच त्याची रणनिती आखण्यात आली. यातील शेतकऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या गडकरींनी शेतकरी समर्थनाची पहिली चाचपणी घेतली.   
मुंबईतील बुधवारच्या शक्तिप्रदर्शनातही नागपुरात केलेल्या भाषणाची गडकरींनी पुनरावृत्ती केली. एकाच आठवडय़ातील त्यांचे हे तिसरे शक्तिप्रदर्शन होते. मात्र, त्यांच्या समर्थनाचे मोजमाप करण्यापेक्षा मुंबईतील मेळाव्यापासून भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी स्वत:ला दूर ठेवल्याचीच चर्चा अधिक झाली. गडकरींच्या मुंबई विमानतळावरील स्वागताचे चित्र फारसे आल्हादायक नव्हते. राष्ट्रीय अध्यक्षाच्या स्वागताला गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आले नाहीत. गडकरींच्या पक्षांतर्गत विरोधाची सुप्त झलक यातून पाहण्यास मिळाली, अशीही चर्चा आहे.