डॉ. नागनाथ कोतापल्लेंची ‘विदर्भपुत्रा ’वर बाजी Print

राम भाकरे / नागपूर
विदर्भात कुठलाही गाजावाजा नाही, प्रचार यंत्रणा नाही की मतदारांच्या भेटीगाठींचा फार्सदेखील नाही, अशा सर्व घडामोडीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जबरदस्त मताधिक्याने बाजी मारली. प्रचारासाठी विदर्भात पाऊलदेखील न ठेवणारे डॉ. कोतापल्ले ‘सायलेंट किलर’ ठरले आहे. त्यांना विदर्भातून मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्याचा अंदाज असून ‘विदर्भपुत्र’ डॉ. शि.गो. देशपांडेंना मतदारांनी नाकारले आहे.
चिपळूणमध्ये पुढील वर्षीच्या जानेवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर झाल्यावर ज्येष्ठ साहित्यिक ह.मो. मराठे आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यामध्ये सर्वाधिक चुरस राहील, अशी अटकळ होती. विदर्भातील १७५ पैकी जास्तीत जास्त मते मिळावी, यासाठी ह.मो., डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी नागपुरात दौऱ्यांचे वर्तुळ पूर्ण केले. विदर्भातील मतदारांशी गप्पा-टप्पा, प्रसार माध्यमांच्या कार्यालयांना भेटी, पत्रकार परिषदा, पत्रकांचा वर्षांव आदी प्रचाराची सर्व तंत्र वापरली. मात्र, नागनाथ कोतापल्ले यांनी विदर्भाकडे पाठ फिरविली. कोतापल्ले यांनी  सर्व लक्ष मुंबई, पुणे आणि मराठवाडय़ात लक्ष केंद्रित केले होते. डॉ. कोतापल्ले यांचा मोठा समर्थक वर्ग विदर्भात आहे. परंतु, मतदान करावे, असे आवाहन करणारे एकही पत्रक विदर्भात वितरित झाले नव्हते. मतदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यावर कोतापल्ले यांचा भर राहिला.
ह.मो मराठे यांना मिळालेल्या १६४ मतांमध्ये विदर्भात जास्तीत जास्त ३० ते ४० मते प्राप्त झाल्याचा अंदाज आहे. डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे विदर्भातील मते आपलीच आहेत, या आवेशात बेसावध राहिले. नंतर त्यांनी दोन दिवस नागपुरात तळ ठोकून आपल्यामागच्या पाठबळाचा अंदाज घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद डॉ. देशपांडे यांच्या पाठिशी होती. विदर्भ साहित्य संघात प्रचारासाठी त्यांनी आयोजिलेल्या बैठकीला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रसार माध्यमांचा आसरा घेतला होता. काही जुन्या-जाणत्या मतदाराच्याही ते संपर्कात होते. त्यांना १०३ मते मिळाली असून विदर्भातून हमोंपेक्षा किंचित अधिक मते त्यांनी घेतली असावीत, असा आडाखा बांधण्यात आला आहे. अशोक बागवे दोन दिवस नागपुरात मुक्कामी राहिले. त्यांच्या प्रचारासाठी नागपुरातील काही कविवर्यानी पुढाकार घेतला होता. मात्र, बागवे यांना केवळ २३ मते मिळाली आहेत.