विदर्भाची कापूसकोंडी Print

शेतक ऱ्यांची दिवाळी संकटात
पणन महासंघाच्या निष्क्रियतेचा कळस
न.मा. जोशी / सचिन देशपांडे - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
 शेतकऱ्यांच्या हाताशी कापूस आला असताना अद्याप सीसीआय आणि कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली नसल्याने विदर्भातील शेतक ऱ्यांची दिवाळी संकटात सापडली आहे. कापसाचे भाव पाडण्याचा जोरदार प्रयत्न होत असून यावर्षी कापूस खरेदीविषयी प्रचंड उदासीनता आहे. कापूस खरेदीच्या जीवनमरणाच्या मुद्दय़ावर शेतक ऱ्यांचे ‘कैवारी’ म्हणविणाऱ्या कथित लोकप्रतिनिधींची तोंडे बंद आहेत.
 पश्चिम महाराष्ट्रात ऊसाबद्दल राजकीय व शेतकरी नेते आक्रमक असतात तशी परिस्थिती विदर्भात कापसाबाबत दिसत नाही. विदर्भातील कापसाला चांगली मागणी राहील, असे सकारात्मक चित्र असतानाही कापूस खरेदी का रखडली, याची समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. कापसाबाबत देशाचे धोरण ठरविण्यात महत्वाची भूमिका असलेल्या कापूस सल्लागार समितीने यंदा कापसाचे उत्पादन घटणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार देशात प्रतिहेक्टरी केवळ ४८८ किलो कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. तर देशात सुमारे ३०८ लाख गाठीचे (१७० किलोची एक गाठ) उत्पादन कापूस सल्लागार समितीला अपेक्षित आहे. गुजरात मध्ये कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३४ लाख गाठींनी घसरत ते ८१ लाख गाठी इतकेच होईल. महाराष्ट्रात यंदा ७४ लाख गाठीचे उत्पादन आणि चांगला भाव अपेक्षित आहे.
कर्जबाजारीपण आणि नापिकी यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्याने गेल्या दोन-तीन वर्षांत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन पिकाचा पर्याय निवडला. मात्र, सोयाबीनचे भाव व्यापाऱ्यांनी ५० टक्क्यांनी पाडले. गेल्या वर्षी कापसाला साडेपाच ते सात हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता आणि हा भाव पुढेसुद्धा टिकून राहण्याच्या आशेवर विदर्भात विशेषत: पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ात मोठय़ा प्रमाणावर कापूस पिकाची लागवड केली.
यवतमाळ जिल्ह्य़ातील साडेनऊ लाख हेक्टर क्षेत्रापकी पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस आणि तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची यंदा लागवड करण्यात आली. सुदैवाने उभ्या महाराष्ट्रात कुठेही झाला नसेल इतका धो-धो पाऊस यंदा यवतमाळ जिल्ह्य़ात झाला. मात्र यवतमाळ, घाटंजी, बाभुळगाव, राळेगाव इत्यादी तालुक्यात पावसाने जमीन खरडून नेली आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दिवाळी तोंडावर असून शेतकऱ्याच्या घरात कापूस यायला लागला आहे.
सोयाबीन मिळेल त्या भावात विकायला शेतकऱ्याला बाध्य व्हावे लागले कारण त्याशिवाय त्याचा दसरा साजरा झाला नसता. खरेदी सुरून झाल्याने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे आपला कापूस सुरुवातीला २५०० ते २८०० भावाने विकावा लागला. सध्या कापसाला काही ठिकाणी ३८०० ते ४ हजार रुपये इतका भाव आहे. आता व्यापाऱ्यांनी सर्वत्र खोडा खरेदी सुरू केलेली आहे.  
शासनाच्या उदासीनतेबाबत कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कापूस खरेदी सुरूकरावी यासाठी मी पत्रे लिहिली, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी नाफेडला कापूस पणन महासंघाशी ताबडतोब करार करून कराराचा आराखडा महासंघासमोर ठेवण्याची सूचनाही केली आहे, मात्र अद्याप करार झाला नसल्यामुळे पणनची कापूस खरेदी सुरूझालेली नाही.