संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. विलास सपकाळ यांच्याकडे Print

नागपूर / प्रतिनिधी
रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. मावळते कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी बजाजनगरातील कस्तुरबा भवनात कुलगुरूपदाची सूत्रे सपकाळ यांच्याकडे आज दुपारी सोपवली. डॉ. चांदे यांना कुलगुरूपदावर तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे तिसऱ्यांदा स्वीकारली होती. संस्कृत विद्यापीठाच्या स्थापनेपासून डॉ. चांदे विद्यापीठाचे कुलगुरू होते. गेल्या १५ वर्षांपासून विद्यापीठाचा कारभार त्यांच्या हाती होता. तीनदा कुलगुरूपदी निवड झालेले ते एकमेव कुलगुरू होते. आज त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून डॉ. सपकाळ विद्यापीठाच्या प्रशासकीय बाबींकडे लक्ष देतील.