गोविज्ञान संशोधन केंद्रातर्फे आजपासून राष्ट्रीय चर्चासत्र Print

नागपूर / प्रतिनिधी
आयुर्वेदामध्ये गोमातेचे स्थान मोठे आहे. गोमूत्र आणि शेणावर गोविज्ञान संशोधन केंद्राने संशोधन करून त्यापासून अनेक आयुर्वेदिक उत्पादने निर्माण केली असून त्यातील अनेक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळाले आहे. या चिकित्सेबद्दल देशभरातील आयुर्वेदिक तज्ज्ञांना माहिती व्हावी आणि ही चिकित्सापद्धती अंमलात आणावी या उद्देशाने ३ व ४ नोव्हेंबरला देवलापारमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्राचे प्रभारी सुनील मानसिंहका यांनी दिली.
देशभरातील गोशाळांच्या माध्यमातून गोमुत्रावर विविध प्रकारे संशोधन सुरू असले तरी देवलापारमध्ये गेल्या १७ वर्षांपासून गोविज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून पंचगव्य चिकित्सा पद्धती आणि गोमुत्रावर संशोधन सुरू आहे. त्यापासून विविध व्याधींवरील औषधांचे उत्पादन करण्यात आले असून आज देशभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयुर्वेद चिकित्सामध्ये पंचगव्याचे महत्त्व वैद्यांना पटवून देणे व त्या चिकित्सेसाठी प्रवृत्त करणे या उद्देशाने देवलापारमध्ये दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात हैदराबादमधील आयआयसीएचे प्रमुख डॉ. विजय कुमार, गुजरातचे दिनेश जानी, राजस्थानचे डॉ. कलवार, डॉ. जयकृष्णा, डॉ. वाते, डॉ. हरदास आणि ‘नीरी’चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांची व्याख्याने होणार आहेत. या चर्चासत्रात देशभरातील ३०० पेक्षा अधिक आयुर्वेद विषयातील तज्ज्ञ, वैद्य आणि गोशाळेचे प्रमुख, शंशोधक सहभागी होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता डॉ. तपन   चक्रवर्ती यांच्या हस्ते होणार आहे.