विद्यार्थ्यांनी पथनाटय़ातून दिला फटाक्यांपासून दूर राहण्याचा संदेश Print

नागपूर / प्रतिनिधी
alt

टाटा पारसी गर्ल्स शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाक्यांपासून दूर राहण्याचा संदेश पथनाटय़ातून दिला. ‘फटाक्यांना लावाल हात, स्वजनांचाच कराल घात, उडवू नका फटाके, तुटतील आयुष्याचे टाके, फटाके आपण ठेवू दूर, समृद्धीचा आणू पूर, वायू-ध्वनी प्रदूषणाचा त्रास, फटाकेच रोखती आपला श्वास, असे फलक घेऊन मिरवणूक काढण्यात आली.
सहयोग ट्रस्टचे विश्वस्त आणि फटाके विरोधी मोहिमेचे प्रणेते डॉ. रवींद्र भुसारी आणि ह्य़ुमन राईटस् अ‍ॅन्ड लॉ डिफेन्डर्सच्या समन्वयिका अ‍ॅड. स्मिता सरोदे सिंगलकर यांच्या नेतृत्वाखाली फटाके विरोधी मिरवणूक काढण्यात आली. त्यात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिवाळीत फटाके न फोडण्याची, ध्वनी आणि वायू प्रदूषणापासून नागपूरकरांना वाचविण्याची शपथही विद्यार्थ्यांना देण्यात आली. २० वर्षांपासून डॉ. रवींद्र भुसारी यांच्या नेतृत्वाखाली फटाके विरोधी मोहीम राबविण्यात येते. सहयोग ट्रस्टच्या माध्यमातून ५० निवडक शाळांमधून फटाके विरोधी उपक्रम राबविले जातात. फटाक्यांमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात तसेच वृक्ष, पशुपक्षी आणि संपूर्ण पर्यावरणावरसुद्धा होणाऱ्या वाईट परिणामाचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. भुसारी यांनी केले.
समाजातील विषमतेचे समर्थन करणारा आवाज म्हणजे फटाके असल्याचे मत अ‍ॅड. सिंगलकर यांनी व्यक्त केले. मिरवणुकीसाठी टाटा पारसी गर्ल्स शाळेच्या सीमा मालपे आणि इतर शिक्षिकांनी सहकार्य केले.