परंपरागत विचारांच्या चौकटीत न अडकता अर्थजाणिवा बळकट करा -गिरीश कुबेर Print

नागपूर / खास प्रतिनिधी
चर्चासत्रात प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर

परंपरागत भावनिक विचारांच्या चौकटीत न अडकता अर्थजाणिवा बळकट केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी केले. विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळातर्फे आयोजित दोन दिवसांच्या द्विवार्षिक चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्रात विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे सचिव प्रा. राजाभाऊ दुरुगकर, सुमित्रा मरसकोल्हे व डॉ. प्रमोद लाखे व्यासपीठावर उपस्थित होते.
अर्थशास्त्र जीवनाशी किती निगडीत आहे, हे विविध घटनांचा उल्लेख करीत गिरीश कुबेर यांनी उलगडून दाखविले. परंपरागत विचारांच्या चौकटीमुळे समाज अर्थाधळा बनला आहे. अर्थशास्त्र व अर्थकारण यांचा मुळात संबंध नाही. अर्थकारण हे अर्थशास्त्र नाही. मुळात आपल्या दैनंदिन जगण्याचा अर्थव्यवस्थेशी संबंध येतो. निवडणुकीसाठी ज्यांनी पैसा दिला, त्यांचे धन्यवाद म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हे वास्तववादी नजरेतून बघायला हवे. १९९३ पासून देशात परकीय गुंतवणूक खुली होत गेली. विमा व वीज आदी क्षेत्रात नियामक कायदा तयार झाला, मात्र विमान व अनेक क्षेत्रात आपण नियामक कायदा तयार करू शकलो नाही. गरीब किती हेसुद्धा निश्चित करू शकलेलो नाही, असे कुबेर म्हणाले.
अर्थसाक्षरतेच्या अभावाने आपल्याला ग्रासले आहे. जी गोष्ट बघतो त्यामागील कारणांचा शोध घेता आला पाहिजे. समाजाची उभारणी भावनिक पातळींवर झाली असल्याने अर्थसाक्षरतेचा विचारच होत नाही. आपली मांडणी अर्थशास्त्राच्या नजरेने सुरू असते, पण आपण त्याला मान्य करीत नाही. अर्थजाणीव नसेल तर खरे काय ते कळत नाही आणि वास्तविकतेचीही जाणीव होत नाही. अर्थजाणिवा प्रगल्भ असाव्या लागतात. जगाच्या पाठीवरील कुठल्याही बारा देशांच्या अर्थसंकल्पाची बेरीज ही अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पाच्या अर्धीही नसते.
अध्र्याहून अधिक देश भावनिकतेचा विचार करणारे आहेत. रोम जळत होता तेव्हा तेथील सम्राटाने त्याच्या प्रधानाला आदेश दिला की, जादूचे प्रयोग कर किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम कर. कारण, अर्थजाणीव नागरिकांना होता कामा नये. भारतातही असेच होत आहे. विजय मल्ल्याने ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आणि त्यापैकी एकही रुपया बँकेला परत केलेला नाही, हे अनेकांना माहीत नाही. अर्थजाणिवा नसल्याने असे होते. अर्थसाक्षरतेअभावी आपण जाणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.
उपस्थित प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. भावना व अर्थसाक्षर हे एकत्र राहू शकत नाही. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ असे पूर्वापार सांगितले जात आहे. अंथरूण वाढवायला मात्र सांगितले जात नाही, असेही कुबेर म्हणाले.   
सध्या शिकविल्या जाणाऱ्या अर्थशास्त्राच्या विविध पैलूंवरही संशोधन झाले पाहिजे, असे डॉ. जयराम खोब्रागडे म्हणाले. प्राध्यापकांनी ज्ञान नेहमी प्रगल्भ ठेवले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही गुणात्मक वाढ होईल, असे प्रा. राजाभाऊ दुरुगकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कौशल्याधारित अभ्यासक्रम आर्थिक विकासाचा पाया ठरू शकतो. शैक्षणिक विकासानेच आर्थिक प्रगती होऊ शकेल, असे प्रा. सुमित्रा मरसकोल्हे म्हणाल्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
गिरीश कुबेर यांचे स्वागत प्रा. रमेश हिमते यांनी केले. प्रा. रजनी हुद्दा यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. विदर्भातील दोनशेहून अधिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.