शैलेशनगरात मायलेकाचा संशयास्पद मृत्यू Print

जळालेल्या प्रेतांनी खळबळ
नागपूर / खास प्रतिनिधी
पूर्व नागपुरातील शैलेश नगरात राहणाऱ्या एक विवाहिता व तिच्या मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली असून हा खून की आत्महत्या अशी शंका निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सरोज ऊर्फ निशा मनोज काटोले (रा. शैलेशनगर) व तिचा आठ वर्षांचा मुलगा स्वयम ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. शैलेश नगरातील नथ्थू बुराडे यांच्या घरी ते भाडय़ाने राहतात. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्वयमला शाळेत नेण्यासाठी त्याचा नेहमीचा ऑटोरिक्षावाला आला. तो दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या स्वयमला आणण्यासाठी वर गेला. त्याला घरातून धूर निघत असल्याचे दिसल्याने तो घाबरला. धावतच तो खाली आला. घरमालकांना त्याने धूर निघत असल्याचे सांगितले. तोपर्यंत शेजारी गोळा झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जयस्वाल, सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर यांच्यासह नंदनवन पोलीस तेथे पोहोचले.
पोलिसांनी दार उघडले असता दाराजवळच सरोजचा मृतदेह पडलेला दिसला. जळून तो काळाठिक्कर पडला होता. खोलीतील पंखा, गादी आणि इतर वस्तू पूर्णपणे जळाल्या होत्या आणि त्यातून धूर निघत होता. लोखंडी पलंगावर स्वयमचा मृतदेह पडला होता. तो जळून काळाठिक्कर पडला होता.
पोलिसांनी गोन्ही खोल्याची तपासणी केली. घरात दोन चिठ्ठय़ा लिहिलेल्या सापडल्या. ‘माझ्या मृत्यूस दुसऱ्यांना जबाबदार समजू नये’ असा त्यावर उल्लेख असून सरोजच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरोज व स्वयम या दोघांच्याही तोंडातून फेस येत होता.
पोलिसांनी या परिसरात प्राथमिक चौकशी केली. सरोजचा पती मनोज हा माजी सैनिक असून गेल्या सात महिन्यांपासून तो अमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट नऊमध्ये तो प्रशिक्षण घेत आहे. सरोज आजारी असल्याच्या कारणाने २७ ऑक्टोबरला मनोज दोन दिवसांची सुटी घेऊन नागपूरला घरी आला होता. २९ तारखेला तो येथून निघून गेला, असे पोलिसांना समजले.
पोलिसांनी तातडीने राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती येथील गट नऊमध्ये संपर्क साधला. मनोज सुटीवर गेला मात्र तो तेथे रुजू झाला नसल्याचे पोलिसांना समजले. तेथून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून पोलिसांनी त्याला संपर्क साधला. ‘अध्र्या तासात येतो’, असे मनोज म्हणाला.
पोलिसांनी त्याची वाट पाहिली. दीडतास झाला तरी तो न आल्याने पोलिसांनी पुन्हा संपर्क साधला असता ‘कारंजा घाडगेजवळ आहे’, असे सांगितले. रात्री उशिरा तो पोलीस ठाण्यात  पोहोचला. पोलीस त्याची चौकशी करीत होते.
सरोजचे माहेर बल्लारशाचे असून तिचा व मनोजचा प्रेम व आंतरजातीय विवाह आहे. त्या दोघांचा कुठलाच वाद नसल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले.हा खून की आत्महत्या अशी शंका निर्माण झाली   असून पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.