बल्लारशहाच्या बेस किचनमुळे हजारो प्रवाशांची सोय Print

मनोज जोशी ,बल्लारशहा
बल्लारशहा येथील बेस किचनचे अंतर्गत दृश्य

रेल्वेगाडय़ांमधील प्रवाशांना जेवण पुरवण्यासाठी कार्यरत झालेल्या बल्लारशहा रेल्वेस्थानकावरील बेस किचनमुळे हजारो प्रवाशांची सोय झाली असून, या स्वयंपाकगृहाचा विस्तार करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
यापूर्वी आयआरसीटीसीकडे दिलेली प्रवाशांची खानपान व्यवस्था काही ठिकाणी रेल्वेच्या अखत्यारित आहे. त्यासाठी रेल्वेने ‘बेस किचन’ सुरू केले आहेत. मध्य रेल्वेवरील पहिले बेस किचन बल्लारशहा येथे १७ जानेवारी २०१२ पासून सुरू झाले. त्याने आता बाळसे धरले आहे. बल्लारशहा स्थानकावरून जाणाऱ्या केरळ एक्सप्रेसमध्ये सुमारे ७०० आणि आठवडय़ात पाच दिवस धावणाऱ्या दूरांतो एक्सप्रेसमध्ये सुमारे १ हजार प्रवाशांना या किचनमधून जेवण पुरवले जाते. याशिवाय दररोज सकाळची न्याहारीही पुरवली जाते. शाकाहारी जेवणासाठी ३० रुपये व मांसाहारी जेवणासाठी ३५ रुपये आकारण्यात येतात, तर पुरी-भाजीचा समावेश असलेला जनता खाना १० रुपयात उपलब्ध करून दिला जातो. यामुळे प्रवाशांना कमी दरात खाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. बल्लारशहानंतर मध्य रेल्वेने सोलापूर व भुसावळ येथेही बेस किचन सुरू केले आहेत.
रात्री १२ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणाऱ्या या बेस किचनमध्ये ५३ कर्मचारी कार्यरत असून विविध कामांसाठी यंत्रांची मदत घेतली जाते. कणिक मळणे, बटाटे सोलणे, इडलीचे पीठ तयार करणे, ग्रेव्ही तयार करणे, या कामांसाठी यंत्रे वापरली जातात. शिवाय पदार्थ तयार करताना स्वच्छतेचे व आरोग्याचे नियम पाळण्यावर भर देण्यात येतो. दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या किचनमधील सोयींचा आता विकास करण्यात आला असून नवी यंत्रे बसवण्यात आली आहेत. यासाठी ३० ते ३५ लाखांचा खर्च झालेला आहे. या किचनमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुमंत देऊळकर यांनी बल्लारशहा येथे पत्रकारांना सांगितले.
कर्मचाऱ्यांचा समान गणवेष, फेस मास्क, टोपी आणि जोडे या धर्तीवरील बल्लारशहा यथील बेस किचनच्या मॉडेलचा नागपुरातही वापर केला जाणार असून, हे बेस किचन नोव्हेंबरअखेपर्यंत कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. खानपान सेवेच्या खाजगीकरणामुळे इतरत्र अतिरिक्त झालेले कर्मचारी येथे सामावून घेण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. जयशंकर, बल्लारशहा येथील स्थानक व्यवस्थापक सुशोवन नायक, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील हे यावेळी हजर होते.