कार्यवृत्ताचे मूल्यांकन विधिसभा सदस्य करणार! Print

नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या कामकाजाचे मूल्यांकन यापुढे विधिसभा सदस्य करणार असून तशी समिती स्वत: होऊन प्रशासनाने विधिसभेत स्थापन करून प्रशासनाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कार्यवृत्तातील चुकांना आळा घालण्यासाठी कुलसचिवांनी समितीची स्थापना विधिसभेत केली. विधिसभेतील कामकाज, विविध मुद्दय़ावर झालेली चर्चा आणि प्रकरणांवरील कार्यवाही यासंदर्भात सादर करण्यात येणाऱ्या कार्यवृत्तात प्रचंड चुका असल्याचे अनेकदा विधिसभा सदस्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या आहेत. अगदी विधिसभा सुरू झाली की कार्यवृत्तातील चुका आणि त्रुटी सुधारण्यातच विधिसभेचा बराच वेळ लागतो. कार्यवृत्तातून आवश्यक बाबी वगळणे, किंवा त्या चुकीच्या लिहिणे ही बाब आता सर्रास निदर्शनास पडत असल्याने त्यावर खबरदरीचा विचार म्हणून डॉ. आर.जी. भोयर, डॉ. डी.के. अग्रवाल, डॉ. के.सी. देशमुख, डॉ. प्रमोद येवले अ‍ॅड. अभिजित वंजारी यांची समिती स्थापन करण्यात आली असून विद्यापीठ प्रशासनापेक्षा विधिसभा सदस्य जास्त चांगल्याप्रकारे काम करू शकते, हेच उघड केले आहे.