न्या. एस.एन. मार्डीकर यांचा चौकशी समितीचा राजीनामा Print

विद्यापीठ सिनेट
 नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बॅरिस्टर वानखेडे शिक्षण महविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या प्राचार्य डॉ. वंदना मानापुरे यांच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. वानखेडे शिक्षण महाविद्यालयातील २०११-१२मधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण विद्यापीठाकडे आले होते. मात्र, त्या प्रकरणात कुठलेही गांभीर्य विद्यापीठ प्रशासनाने लक्षात न देता विधिसभेत सदस्यांच्या प्रश्नांना थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी विद्यापीठाच्या सहज वृत्तीला लगाम घालत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि संबंधित प्रकरण सुनावणीसाठी येणे या दोन भिन्न बाबी असल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासनाचे अज्ञान दूर केले. शिवाय व्यक्तीची चौकशी करताना चौकशी करणाऱ्याचे वय, पद, ग्रेड-पे जास्त असायला हवे, ही कायदेशीर तरतूदही प्रशासनच्या लक्षात आणून दिली. यावेळी प्रशासनातर्फे डॉ. अरविंद चौधरी आणि डॉ. अशोक गोमासे सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उपस्थित असल्याने गेल्या १ नोव्हेंबरला चौकशी समितीचे अध्यक्ष न्या. एस.एन. मार्डीकरांनी राजीनामा दिला असून यानंतर योग्य व्यक्तीकडूनच संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठाच्यावतीने देण्यात आले.