मोटारवाहन निरीक्षकांकडून साडेचार लाख रुपये जप्त Print

नागपूर / खास प्रतिनिधी
देवरीहून नागपूरला परतणाऱ्या प्रादेशिक परिवहन खात्याच्या दोन निरीक्षकाजवळून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी साडेचार लाखाहून अधिक रक्कम जप्त केली. यासंबंधी पुढील चौकशी शासनाच्या परवानगीनंतरच होऊ शकणार आहे.
गोंदियाहून नागपुरात निघालेल्या प्रादेशिक परिवहन खात्याच्या दोन मोटारवाहन निराक्षकांजवळ लाखो रुपयांची रक्कम असल्याची गुप्त माहिती भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक निशीथ मिश्रा यांना रात्री मिळाली. त्यांनी तातडीने पथके भंडारा मार्गावर रवाना केली. उपअधीक्षक संजय पुरंदरे, चंद्रशेखर बहादुरे व नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भंडारा मार्गावर कापसी येथील बायपासवर सापळा रचला.  रात्री भंडाऱ्याकडून येत असलेल्या इनोव्हा (एमएच/३९/२४१७) आणि त्यामागील झायलो (एमएच/२९/आर/२६३६) थांबवून झडती घेण्यात आली. इनोव्हामध्ये मोटारवाहन निरीक्षक मिलिंद दत्तात्रेय खानोरे होते. कारमध्ये ३ लाख ११ हजार १०० रुपये सापडले. झायलोमध्ये मोटारवाहन निरीक्षक गोविंदा कान्होजी तासके होते. कारमध्ये १ लाख ६३ हजार रुपये सापडले. या दोघांना तातडीने भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. ही रक्कम कशाची, याचे समाधानकारक उत्तर ते दोघे देऊ शकले नाहीत. ही रक्कम जप्त करण्यात आली. या दोघांजवळ रक्कम सापडल्यानंतर लगेचच देवरी येथील आरटीओच्या तपासणी नाक्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने तपासणी केली.
हे दोघेही प्रथम श्रेणी अधिकारी असल्याने त्यांच्या चौकशीची परवानगी शासनाकडून घ्यावी लागणार आहे. तशी परवानगी मागणारे पत्र भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आले आहे. तेथून ते गृहसचिवांकडे पाठविले जाईल. त्यांच्याकडून परवानगी आल्यानंतर या प्रकरणाची पुढील चौकशी केली जाणार आहे.