नक्षल चळवळीत जाणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी तंत्रशिक्षणाचे उपक्रम Print

नागपूर / खास प्रतिनिधी
नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांमधील आदिवासी तरुणाईला नक्षल चळवळीपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे विशेष कौशल्य विकास योजना राबविली जात आहे. मात्र, राष्ट्रीय कौशल्य विकास विकास महामंडळाच्या मार्फत तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी आदिवासींचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
नक्षलग्रस्त राज्यातील कार्पोरेट क्षेत्रात या तरुणांना सामावून घेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून संगणक आणि मोबाईल दुरुस्ती, मोटार मेकॅनिक, कॅटरिंग, आतिथ्य, सुतारकाम, नर्सिग सहायक आणि ड्रायव्हिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पुढील महिन्यापासून आदिवासी तरुणांसाठी तीन महिन्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होत आहे. आतापर्यंत देशभरातून दीड हजार तरुणांनी यासाठी नोंदणी केली आहे. यानंतरच्या तिमाहीत दोन हजार तरुणांना प्रशिक्षणात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीवर केंद्र सरकार ३० हजार रुपयांचा खर्च करीत असून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने प्रशिक्षित तरुणांना कार्पोरेट क्षेत्रात संधी देण्याची हमी घेतली आहे.  नेहरू युवा केंद्राने महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातील तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड केली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने कार्पोरेट कंपन्यांशी करार करून या प्रशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याची हमी स्वीकारली आहे.
या वर्षीच्या प्रारंभी जम्मू-काश्मिरातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाच वर्षांचा अशाच प्रकारचा ‘उडान’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात दरवर्षी ८ हजार पदवीधर, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक पदवीधारक तरुणांना तंत्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘उडान’ची अंमलबजावणी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळातर्फे केली जात आहे.