काठी हेही घातक शस्त्र उच्च न्यायालयाचा निर्वाळा Print

नागपूर / प्रतिनिधी
काठी हेही चाकूइतकेच घातक शस्त्र असल्याचा निर्वाळा देऊन, स्वसंरक्षणार्थ एका व्यक्तीची हत्या करण्याचा आरोप असलेल्या तिघाजणांची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे.
औरंगाबाद येथील या घटनेत २२ मार्च २००९ रोजी दोन गटांमध्ये भांडण झाले. शेख अमजद हा त्याचा पुतण्या शेख नझीर याला त्याच्या वडिलांच्या हजेरीत शिवीगाळ करत होता. तक्रारकर्ता शेख फिरोझ याच्या म्हणण्यानुसार तो व त्याचे भाऊ यांनी अमजदला समजाविण्यासाठी हस्तक्षेप केला.
यावेळी झालेल्या झटापटीत आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉकी स्टीकने करण्यात आलेल्या मारहाणीत अमजदचाही उजवा हात फ्रॅक्चर झाला. मारामारी सुरू असतानाच पठाण याने अमजदच्या हाती गुप्ती दिली आणि त्याने नाझीरच्या पोटावर वार केले. यात गंभीर जखमी झालेला नाझीर त्याच दिवशी शासकीय इस्पितळात मरण पावला.
बेगमपुरा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खून, प्राणघातक हल्ला व इतर आरोपांखाली गुन्हे दाखल केले. औरंगाबाद येथील सत्र न्यायालयाने तिघांना सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवून प्रत्येकी ७ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. त्याला तिघांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.
मारामारीत हॉकी स्टीकमुळे उजवा हात फ्रॅक्चर झाल्यानंतर अमजदला शत्रूंकडून मारले जाण्याची भीती वाटणे स्वाभाविक होते. काठी हे चाकूपेक्षा कमी दर्जाचे शस्त्र नसून, काठीने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आल्यास त्याच्या मनात जीव जाण्याचे किंवा जबर जखमी होण्याचे भय उत्पन्न करण्यास पुरेसे आहे, असे न्या. अंबादास जोशी व न्या. यू.डी. साळवी यांच्या खंडपीठाने नमूद   केले. नखे आणि पंजे अशी शस्त्रे जवळ असणारा शक्तिमान वाघही भीतीमुळे स्वत:चे रक्षण करण्यास असमर्थ असलेल्या माणसावर हल्ला करतो. या प्रकरणातील आरोपीही त्याला अपवाद नसल्यामुळे त्याने अशा परिस्थितीत वेगळे वागणे अपेक्षित नव्हते. सर्वच जीवांमध्ये स्वत:चे संरक्षण ही अंगभूत प्राथमिक जाणीव असून, घटनेच्या वेळेस आरोपीसाठीही तेच महत्त्वाचे होते, असे सांगून न्यायालयाने शेख अमजद शेख असद, त्याचे वडील शेख असद शेख लाल आणि मित्र जावेद पठाण या तिघांची सुटका केली.