वरोऱ्यात पहिले सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन Print

नागपूर / प्रतिनिधी
सर्वधर्मीय संत साहित्याचे आणि विचारांचे आदान प्रदान व्हावे आणि विविध ग्रंथसंपदाची ओळख व्हावी, या उद्देशाने पाक्षिक मुस्लिम मराठी आणि वरोऱ्याच्या हिरालाल लोया महाविद्यालयाच्यावतीने १७ व १८ नोव्हेंबरला वरोऱ्यामध्ये पहिले राज्यस्तरीय सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.   या संमेलनात राज्यातील विविध भागातील संत साहित्याचे अभ्यासक आणि धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे आमंत्रक प्रा. जावेद पाशा यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसीय सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन राज्यात वरोऱ्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. ‘समताधिष्ठीत समाज रचनेसाठी संत साहित्याचे योगदान’ या विषयाच्या अनुषंगाने विविध चर्चासत्र, परिसंवाद, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून महानुभव पंथाचे आचार्य न्यायमबाबा शास्त्री यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यु.म. पठाण यांनाही संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हिरालाल लोया महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलनाची तयारी सुरू असून १७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी दिंडी काढण्यात येणार असून यावेळी पालखीत सर्व धर्माचे संत साहित्य ठेवण्यात येणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने परिसरात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्यात विविध धर्माचे संत साहित्य राहणार आहे. यावेळी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून या स्मरणिकेचे संपादन तायेरा शेख यांनी केले आहे.
 संमेलनाचे संयोजक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश गांधी आहेत. या संमेलनात डॉ. सुहास फरताळे (सोलापूर), प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, डॉ. रावसाहेब पाटील, भंते ज्ञानज्योती, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शरफुद्दीन साहिल, विलास सोनवणे (पुणे), ज्ञानेश्वर रक्षक, प्रा. ब्रम्हदत्त पांडे, जबाबर पटेल, प्राचार्य हारून खान, डॉ. राजेंद्र वाटाणे,आचार्य न.न थुटे, अशोक सरस्वती, प्रविणाबेन देसाई, डॉ. तस्नीम पटेल, लक्ष्मणराव गमे, ज्ञानेश्वर रक्षक आदी संत साहित्याचे अभ्यासक आणि विचारवंताना आमंत्रित करण्यात आले आहे. आयोजकांतर्फे बाहेरून येणाऱ्या निमंत्रितांची राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.