नागपुरात डेंग्यूने हातपाय पसरले |
![]() |
नागपूर / प्रतिनिधी शहरातील विविध भागात असलेली अस्वच्छता आणि बदलत्या वातावरणामुळे शहरातील विविध शासकीय आणि खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण वाढले असून ऑक्टोबर महिन्यात २१३ संशयित तर ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने डेंग्यू नियंत्रणासाठी शहरातील विविध भागातील घरांची तपासणी सुरू केली असून २ नोव्हेंबपर्यंत १ लाख १ हजार ३७२ घरांना भेटी दिल्या असून त्यात ५ हजार २२२ घरांमध्ये डासअळी आढळून आली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालया, इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय, महापालिका रुग्णालयासह शहरातील विविध शासकीय आणि खाजगी रुग्णांलयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान डेंग्यूंचे एकूण २६३ संशयित तर ४८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. महापालिकेने औषध व धूर फवारणी तसेच घरांची तपासणी सुरू केली आहे. महापालिकेचे २२० कर्मचारी व १०० सामाजिक कार्यकर्त्यांचा मोहिमेत समावेश आहे. नियमित कर्मचाऱ्यांमार्फत एकूण १ लाख ९७ हजार ३१३ घरांची तपासणी करण्यात आली. यात ११ हजार ४८० घरे दूषित आढळली. घरोघरी ४ लाख ४१ हजार ८२८ भांडय़ांची तपासणी केली असता १२ हजार ८८० भांडी दूषित असल्याचे दिसून आले. विशेष मोहिमेतंर्गत तपासणीत २ लाख २५ हजार ३४ पाणी साठविण्याच्या भांडय़ापैकी ६ हजार ८०१ भांडय़ामध्ये डासअळी आढळून आली. त्यापैकी २ हजार २६३ पाण्याची भांडी रिकामी करण्यात आली. सोबतच ४ हजार ५५८ भांडय़ांमध्ये टेमेफॉसचा उपयोग करण्यात आला. कुलर, निरुपयोगी टायर, ड्रम, टाक्या, रांजण, कुंडय़ा, फुलदाणी यामध्ये जास्तीत जास्त डासअळ्या आढळून आल्या आहेत. साचलेल्या पाण्यात एमएलओ ऑईल व अॅबेटची फवारणी करण्यात आली. प्रत्येक झोनमधील सहायक आयुक्तांमार्फत मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या मार्फत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असून शिक्षक दररोज दहा मिनिटे विद्यार्थ्यांच्या घर व परिसरातील स्वच्छेबाबत आढावा घेऊन स्वच्छतेबाबत जागृत केले जात आहे. वस्तींमध्ये पत्रके वाटण्यात येत असून आतापर्यंत २ लाख पत्रके शाळा महाविद्यालय व वस्तींमध्ये वाटण्यात आली आहे. तसेच शहरातील विविध भागात होर्डीग्ज लावण्यात आले आहे. शहरातील सात लाख मोबाईलधारकांना एसएमएस पाठवून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दहा-बारा दिवसात वाढलेली रुग्णांची वाढती संख्या बघता महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना, डॉक्टरांना विशेष काळजी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले असल्याचे डॉ. गणवीर यांनी सांगितले. |