प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करणाऱ्या ठगाला अटक Print

नागपूर / खास प्रतिनिधी
एका प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करून त्याला लुटल्याप्रकरणी एका ठगास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विषप्रयोगाने रेल्वे प्रवासी तसेच अनेकांना त्याने लुटल्याची पोलिसांची माहिती असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
हेमंत श्याम राठोड उर्फ रमेश श्याम यादव हे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा जबलपूरचा राहणारा आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो बिनाकी मंगळवारीत राहत आहे.
ाीलेश मेट्टेवार (रा. पार्वतीनगर) हा प्रॉपर्टी डीलर ४ सप्टेंबरला टेकडी गणपतीच्या दर्शनाला गेला. त्याला एका भोंदूबाबाने रोखले. प्रसाद म्हणून दूध प्यायला दिले. तो बेशुद्ध झाला. पाच दिवसांनंतर त्याला शुद्ध आली तेव्हा तो गिल्लुरकर रुग्णालयात होता. त्याच्या कारमधील अडीच लाख रुपये लुटल्याची तक्रार त्याने सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली. सीताबर्डी पोलिसांसह गुन्हे शाखेनेही स्वतंत्र तपास केला. पोलीस निरीक्षक माधव गिरी व सहायक निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी हेमंत श्याम राठोड उर्फ रमेश श्याम यादव याला अटक केली.  आरोपीजवळ विविध ओळखपत्रे, १८० विषारी गोळ्या, या गोळ्यांची १७० रिकामी पाकिटे व दहा हजार रुपये रोख सापडली. रेल्वे प्रवासात चहा किंवा दुधातून विषारी गोळ्यांची भुकटी देऊन बेशुद्ध करायचे व त्यांना लुटायचे, अशी आरोपीची गुन्ह्य़ाची पद्धती आहे. अतिशय धूर्त असलेला हा आरोपी वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करतो आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.