बिल्डरांच्या गाडय़ा चोरणारा चालक अटकेत Print

गुन्हे वृत्त
नागपूर / प्रतिनिधी
नागपुरातील दोन बडय़ा बिल्डरांच्या घरून कार चोरणाऱ्या एका आरोपीस पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्याने आधी आणखी चार चाकी वाहने चोरल्या असल्याची शक्यता असून चार चाकी वाहने चोरीस गेलेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पाचपावली पोलिसांनी केली आहे.
महेंद्र गुलाब चाके (रा. सालई गोधनी, हुडकेश्वर रोड) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पाचपावली पोलीस कामठी मार्गावर वाहन तपासणी करीत असताना आरोपी स्कार्पिओ (एमएच/४०/ए/२७४०) चालवित होता. वाहन व कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशयावरून पोलिसांनी त्याला ‘बोलते’ केले. दोन महिन्यांपूर्वी कन्हैया डेव्हलपर्सचे मालक मुकेश झाम (रा. हनुमाननगर) यांच्या घरासमोरून मध्यरात्रीनंतर ती चोरल्याचे त्याने सांगितले. वर्धा मार्गावरील हिंदुस्थान कॉलनीतील हॅप्पीहोम डेव्हलपर्स कार्यालयासमोरून बोलेरो जीप मध्यरात्रीनंतर चोरल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्याला अटक करून दोन्ही चारचाकी वाहने जप्त करण्यात आली.   
आरोपी महेंद्र चाके याने झाम व वाळके या दोघांकडेही वाहन चालक म्हणून नोकरी केली आहे. काही दिवस नोकरी केल्यानंतर ते बनावट किल्ली तयार करायचा.
अचानक नोकरी सोडून निघून जायचा. काही दिवसांनंतर मध्यरात्रीनंतर येऊन बनावट किल्लीने वाहन चोरून न्यायचे, अशी त्याची पद्धत होती. याआधी त्याने आणखी चार चाकी वाहने चोरल्या असल्याची शक्यता असून ज्यांची चार चाकी वाहने चोरीस गेली त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पाचपावली पोलिसांनी केले आहे.
ट्रकच्या धडकेने सायकलस्वार ठार
वेगात आलेल्या ट्रकच्या धडकेने सायकलस्वार ठार झाला. कळमना रिंग रोडवर बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. केशव लक्ष्मण धारणे (रा. विनोबा भावे नगर) हे त्याचे नाव आहे. सायकलने जात असता वेगात आलेल्या ट्रकने (डब्ल्युबी/३१/५१२७) त्याला धडक दिली. या अपघातात तो ठार झाला. या अपघाताप्रकरणी ट्रक चालक आरोपी आबुलअली तैमुलअली (रा. जि. कंटई) याला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली.
चेन स्नॅचिंग
मोटारसायकलवर आलेल्या लुटारूंनी पादचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून नेली. काटोल मार्गावर बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ब्रिजपाल मेहरबानसिंग ठाकूर (रा. नर्मदा कॉलनी) हा त्याच्या काकांच्या घरी गेला होता. तेथून तो पायी घरी जात होता. मागून मोटारसायकलवर वेगात आलेल्या लुटारूंनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन (किंमत २२ हजार रुपये) खेचून लुटारू पळून गेले. त्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी प्रवीण उर्फ सोनू विनोद बाबरे (रा. पेंशननगर) व हेमंत भास्कर वानखेडे (रा. बोरगाव) अटक केली.