पाण्याच्या नादुरुस्त मीटरचा भरुदड ग्राहकांवर; जनमंचचा आरोप Print

नागपूर / प्रतिनिधी
पाण्याच्या नादुरुस्त मीटरचा भरुदड ग्राहकांवर लादला जात असल्याचा आरोप करून २४ बाय ७ योजनेच्या नावाखाली महापालिकेकडून सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केली.
धरमपेठ झोन अंतर्गत असलेल्या हिलटॉपमधील शिवार्पण अपार्टमेंटचे पाण्याचे मीटर एप्रिल २०१२ पासून नादुरुस्त झाले. यामुळे पाण्याच्या बिलात वाढ झाली. नादुरुस्त मीटरची तक्रार करण्यात आली. तपासणीत मीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले.
 महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने १८ जून २०१२ ला नादुरुस्त मीटर बदलवून दिले. नादुरुस्त मीटरमुळे अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना एप्रिल ते जूनपर्यंत १५ हजार १८३ रुपयांचे बिल पाठविण्यात आले. नवीन मीटरव्दारे १८ जून ते ३० ऑगस्टपर्यंत ४ हजार ७६९ रुपयांची आकारणी करण्यात आली. नवीन मीटरव्दारे पाण्याच्या बिलाची आकारणी झालेली असताना नादुरुस्त मीटरव्दारे झालेल्या पाण्याच्या बिलाच्या आकारणीत दुरुस्ती होणे आवश्यक होते.
या अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांनी नादुरुस्त मीटरव्दारे करण्यात आलेल्या पाण्याच्या वापराच्या आधारावर बिलाची आकारणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग व धरमपेठ झोनच्या उपअभियंत्यांना पाचवेळा पत्र दिले. परंतु अजूनही नादुरुस्त मीटरव्दारे दर्शविण्यात आलेल्या बिलाचे समायोजन करण्यात आलेले नाही. यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी वापरणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भरुदड टाकला जात आहे, असा आरोप जनमंचने केला आहे. महापालिकेकडून २४ बाय ७ योजनेच्या नावाखाली  सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, प्रमोद पांडे, राजीव जगताप, मनोहर खोरगडे, प्रभाकर खोंडे, प्रदीप निनावे आदींनी केली आहे.