भाजीवाल्याच्या सजगतेमुळे बनावट नोटा चलनात आणणारे दोघे अटकेत Print

नागपूर / प्रतिनिधी
भाजीवाल्याच्या सजगतेमुळे बनावट नोट चलनात आणू पाहणारे दोघे सक्करदरा पोलिसांच्या आयतेच हाती लागले. त्यांच्याजवळून ८७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
राजेश मारुती सिंगनदीपे व प्रवीण रामचंद्र बावीसटाले (रा. सुभाषनगर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सक्करदरामधील कमला नेहरू महाविद्यालयासमोरील बुधवार बाजारात विनोद शेषराव अनशेटवार (रा. खरबी) हा भाजी विकतो. बुधवारी रात्री तो बाजारात बसला असताना एक ग्राहक त्याच्याजवळ आला. भाजी घेऊन त्याने शंभर रुपयांची नोट विनोदला दिली. ती नोट पाहून विनोदला शंका आली. शेजारच्या भाजीवाल्यास विचारले. ते पाहून ग्राहक पळू लागला. भाजीवाल्यांनी पळून जाणाऱ्यास पकडले आणि सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले. राजेश मारुती सिंगनदीपे असे नाव त्याने सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ शंभरच्या चौदा नोटा सापडल्या. त्याने आधी आणखी एका भाजीवाल्यास शंभरची नोट दिली होती. एकूण सोळा बनावटी नोटा पोलिसांनी जप्त केल्या. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याचा साथीदार आरोपी प्रवीण यालाही अटक करण्यात आली.
दोघेही आरोपींनी संगणकाचा अभ्यासक्रम केला असून ते पूर्वी आयटी कंपनीत कामाला होते. घरी संगणक व प्रिंटर विकत आणून त्यांनी खऱ्या नोटांचे स्कॅनिंग करून बनावट नोटा चलनात आणल्या. त्यांच्या घरून हे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, बुधवार बाजारात बनावट नोटा चलनात आणताना काही वर्षांपूर्वी एका महिलेला अटक करण्यात आली होती.
नागपूर शहरासह विदर्भात अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची पोलिसांची माहिती आहे. काल अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी आणखी किती बनावट नोटा चलनात आणल्या याची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.