रेल्वेमार्गावर प्रेमीयुगुलाची आत्महत्या Print

नागपूर / खास प्रतिनिधी
मानकापूर ते गोधनी रेल्वे मार्गावर प्रेमीयुगुलाने मध्यरात्रीनंतर रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तरुण व तरुणी बुधवारपासून घरून बेपत्ता होते.
रश्मी सुनील बावनगडे (रा. मॉडेल टाऊन, बेझनबाग) व अरमान उर्फ दीपक करमचंदानी (रा. हुडको कॉलनी) ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. मानकापूर ते गोधनी रेल्वे मार्गावर दोन मृतदेह पडले असल्याचे मध्यरात्रीनंतर कळल्यानंतर कोराडी पोलीस तेथे गेले.
मानकापूर रेल्वे फाटकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मृतदेह पोलिसांना दिसले. रेल्वे रुळांच्या मध्यभागी तरुणाचा आणि त्यापासून सुमारे ५ मीटर अंतरावर तरुणीचा मृतदेह पडला होता. दोन्ही मृतदेह छिन्न-विच्छिन्न होऊन त्यांचे अवयव दूरवर फेकले गेले होते. मोठय़ा मुश्किलीने पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे अवयव शोधून ते एकत्र केले. तरुणीच्या मृतदेहाजवळ छायाचित्र व मोबाईल पडला होता. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी व दोघेही एकमेकांच्या जवळ उभे असावे, अशी शंका पोलिसांना आली. पोलिसांनी तरुणीच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलमधील क्रमांकावर तातडीने संपर्क साधला असता तो त्या तरुणीच्या घरी लागला. तिचे कुटुंबीय तातडीने घटनास्थळी पोहोचले. अंगावरील कपडय़ांवरून तो मृतदेह रश्मीचा असल्याचे घरच्यांनी ओळखले. तिची ओळख पटवताना त्यांना शोकावेग आवरला नाही. दुसरा मृतदेह अरमानचा असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यांनी अरमानची ओळख पटविली. सकाळी ही घटना  हुडको कॉलनी व मॉडेल टाऊन परिसरात पसरली. कोराडी पोलिसांनी याप्रकरणी आज सकाळी प्राथमिक चौकशी केली. काल सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रेल्वे मार्गावर अरमान व रश्मी फिरताना रेल्वेच्या गँगमनला दिसले होते.
शंका आल्याने त्या दोघांना त्याने हटकले. किती गाडय़ा जात आहेत मोजत असल्याचे त्या दोघांनी त्याला सांगितले. रेल्वे रुळांवर जाऊ नका, अशी ताकीद देऊन गँगमन तेथून निघून गेला. रश्मी तिडके विद्यालयात बारावीत शिकत होती. अरमानचे वरपाखडमध्ये सीडी विक्रीचे दुकान आहे. अरमान व रश्मीचे एकमेकांवर प्रेम होते. रश्मीची परीक्षा गुरुवारी संपणार होती. बुधवारी सकाळी ती परीक्षेसाठी घरून निघाली ती रात्रीपर्यंत घरी आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी जरीपटका पोलीस ठाणे गाठले. ती बेपत्ता असल्याचे तसेच अरमानने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली. अरमान व रश्मी यांचे प्रेम असल्याचा त्यांनी इन्कार केला. रश्मी याबाबत कधीच बोलली नव्हती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अरमानविरुद्ध गुन्हा दाखल केला. मध्यरात्रीनंतर तीन वाजताच्या सुमारास कोराडी पोलिसांकडून घटनेची माहिती समजली तेव्हा हे कुटुंब हादरून गेले. या प्रकरणाची पुढील चौकशी जरीपटका पोलीस करीत
आहेत.