नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्यांना सबसिडी सिलिंडर लगेचच नाही Print

नागपूर / प्रतिनिधी
नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकास आता लगेचच सबसिडीचे सिलिंडर मिळणार नाही. ‘डी डुप्लिकेशन प्रोग्राम’नुसार तपासणी पूर्ण होऊन त्यातून क्लिअरन्स मिळेपर्यंत ९६६ रुपयेच सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्देशानुसार आता गॅस कंपन्यांमध्ये ‘डी डुप्लिकेशन प्रोग्राम’ म्हणजेच ग्राहकाजवळ एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन आहेत का, यचा शोध घेणे सुरू आहे. एकापेक्षा अधिक कनेक्शन्स शोधण्यासाठी या कंपन्यांजवळ विशिष्ट संगणकीय सॉफ्टवेअर आहे. एकच नाव व पत्त्यावर किती कनेक्शन्स आहेत, हे सहजरित्या शोधून काढले जाते. आगामी ३१ मार्चपर्यंत हे काम कंपन्यांना पूर्ण करावयाचे आहे. त्यामुळे नवे गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो आहे. अशा गॅस ग्राहकांना ‘डी डुप्लिकेशन प्रोग्राम’नुसार तपासणी पूर्ण होऊन त्यातून क्लिअरन्स मिळेपर्यंत ९६६ रुपयेच सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कनेक्शन्स नसल्याचे सिद्ध झाल्यास तशी सूचना विक्रेत्याला केली जाईल व त्यानंतर सबसिडीच्या किमतीत त्याला सिलिंडर दिले जाईल.
केवायसी (नो युवर कस्टमर) अर्जामुळे सध्या सर्वच गॅसधारक त्रस्त आहेत. सर्वच ग्राहकांना केवायसी अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या ग्राहकांना टपालामार्फत हा अर्ज घरपोच येईल, त्या ग्राहकाला हा अर्ज भरून द्यावयाचा आहे. एकाच नाव व पत्त्यावर दोन कनेक्शन्स, नाव वेगळे मात्र पत्ता एकच, नवे कनेक्शन घेणारे, बाहेरून स्थानांतर करून आलेले अशा ग्राहकांना केवायसी अर्ज भरणे बंधनकारक आहे. ज्यांनी आधीच हा अर्ज भरून दिला आहे त्यांनीही चिंता करण्याचे कारण नाही, असे गॅस कंपन्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. नवे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांनी सबसिडी बंद करण्यात आलेली नाही. सबसिडीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आधी विनासबसिडी सिलिंडर घ्यावे लागेल. एक-दोन महिन्यात ‘डी डुप्लिकेशन प्रोग्राम’नुसार तपासणी होईल आणि त्यानंतर त्या ग्राहकाला सबसिडीचे सिलिंडर दिले जाईल, असे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडचे नागपूर विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अमिताभ धर यांनी स्पष्ट केले.