पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला कारावास Print

नागपूर/प्रतिनिधी
पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या इसमाला सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.बाबुलाल वाघमारे (२७) असे आरोपीचे नाव असून तो कामनानगर येथील रहिवासी आहे. जानकी (२१) असे त्याच्या मृत पत्नीचे नाव होते.बाबुलाल याने त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून दिल्यानंतर परसोडी केळवद येथे राहणाऱ्या कांताबाई टिल्लारे यांची मुलगी जानकी हिच्याशी २८ मार्च २०१२ रोजी लग्न केले होते. लग्नात सोन्याची अंगठी दिली नाही या कारणासाठी बाबुलाल दारूच्या नशेत जानकीचा छळ करत असे. ही गोष्ट जानकीने माहेरी आल्यानंतर सांगितली होती. लग्नानंतर केवळ ४२ दिवसांनी बाबुलालने  दारूच्या नशेत जानकीला मारहाण केली.  छळ असह्य़ होऊन तिने विष पिले. यानंतर एक तासाने बाबुलालने जानकीच्या माहेरी फोन करून तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. आणखी तासाभराने पुन्हा फोन करून त्याने जानकी मरण पावल्याची बातमी दिली.