लोकसत्ताच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन Print

नागपूर/ खास प्रतिनिधी
‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीच्या ‘विदर्भरंग दिवाळी अंक २०१२’चे प्रकाशन उद्या, शनिवारी वेकोलिचे उप-व्यवस्थापक (जनसंपर्क) आशिष तायल आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका व महाराष्ट्रातील पहिली महानाटय़ निर्माती आसावरी तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
 आशिष तायल व्यावसायिक जनसंपर्क क्षेत्रातील विशेषज्ञ असून, त्यांनी अनेक नामवंत कंपन्यांसमवेत जनसंपर्काचे जाळे विस्तारले आहे. आसावरी तिडके या झाडीपट्टी, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमधील नामवंत अभिनेत्री असून, त्यांनी सध्या प्रचंड गाजत असलेल्या ‘गजानन माझा शेगावीचा राजा’ आणि ‘शिरडी के साईबाबा’ या महानाटय़ाच्या निमित्ताने निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला महानाटय़ निर्माती होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. दै. ‘लोकसत्ता’च्या ग्रेट नाग रोडवरील कार्यालयात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या प्रकाशन समारंभाला दिवाळी अंकात योगदान देणारे लेखक-लेखिकाही उपस्थित राहतील. यावेळच्या दिवाळी अंकात ज्वलंत सामाजिक, पर्यावरणीय आणि वन्यजीव जगताशी संबंधित विषयांचा वेगळ्या ढंगाने ऊहापोह करण्यात आला आहे. विदर्भरंग दिवाळी अंकाचे १३ नोव्हेंबरच्या अंकासमवेत वितरण केले जाणार आहे.