कोजागिरीनिमित्त सप्तश्रृंगी गडासाठी १८५ जादा बसेस Print
नाशिक / प्रतिनिधी
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सप्तश्रृंगी गडावर ११ व १२ ऑक्टोबर या कालावधीत १८५ जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली असून प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाने केले आहे.
कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त साधून भाविक सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्याकरिता मोठय़ा संख्येने गडावर दाखल होत असतात. यंदा कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी सकाळी ५.०९ मिनिटांनी सुरू होवून मंगळवारी सकाळी ७.३५ मिनिटांनी संपणार आहे. यामुळे या कालावधीत जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. या काळात सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी खासगी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. यामुळे नाशिक विभागातील सर्व आगारांमार्फत जादा बसेस चालविल्या जातील. त्यानुसार नांदुरी ते श्री सप्तश्रृंगी गड येथून ६५ बसेस, नाशिक ते थेट सप्तश्रृंगी गड ७५, मालेगाव ते श्री सप्तश्रृंगी गड २०, मनमाड ते थेट श्री सप्तश्रृंगी गड १५, सटाणा ते श्री सप्तश्रृंगी गड १० बसेस अशा जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी केले आहे.