सिलिकॉन व्हॅलीतर्फे वृक्षारोपण Print
नाशिक वृत्तान्त

नाशिक / प्रतिनिधी
झोपडपट्टीजवळील कचरा साचलेल्या भागात सिलिकॉन व्हॅलीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून एक अनोखी सामाजिक बांधिलकी दाखवली. महापालिकेच्या सदर भूखंडाचा परिसरातील नागरिक कचरा व टाकाऊ वस्तू टाकण्यासाठी उपयोग करतात. त्यामुळे परिसरात दलदल, घाण व दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. याजागी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केल्यास लोकांना या भूखंडाचा भविष्यात चांगल्या कामासाठी उपयोग होऊ शकेल, या उद्देशाने सिलिकॉन व्हॅलीचे संचालक प्रमोद गायकवाड यांनी याजागी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम आखला.
या उपक्रमास उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, नगरसेवक नय्या खैरे, रंजना पवार, सिलिकॉनचे संचालक प्रमोद गायकवाड, उद्यान निरीक्षक यु. बी. पवार हे उपस्थित होते. महापालिकेने शहरातील संस्थांना वृक्षारोपणासाठी आवाहन केले होते. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल संचालक प्रमोद गायकवाड यांचा निमसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिसरात कार्यरत असलेला जुने नाशिक ज्येष्ठ नागरिक संघ वृक्ष संवर्धनाच्या कामास सिलिकॉन व्हॅलीला सहकार्य करेल, असे आश्वासन याप्रसंगी अध्यक्ष तांबे यांनी दिले. सिलिकॉन व्हॅलीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या भूखंडावर वृक्षारोपण केले.