दिवाळीच्या आनंदात रमला ‘घरकुल’ परिवार Print

शहरातील १५ गतिमंद विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी
नाशिक / प्रतिनिधी
कोणी रांगोळी काढण्यात तर कोणी आकाशकंदील लावण्यात मग्न..कोणी दारासमोर पणत्या लावतंय तर कोणी फुलांच्या माळांची सजावट करण्यात गुंग..आपलं ‘घरकुल’ सुंदर दिसावे, यासाठी सर्वाची धडपड. अर्थात त्यासाठी कारण ठरलं ते दिवाळीचं. घरकुलमध्ये काही दिवस आधीच म्हणजे मंगळवारी मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींनी प्रकाशाचा उत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा केला. या उत्सवात शहरातील १५ गतिमंद विद्यार्थी व त्यांचे पालकही सहभागी झाले.
दिवाळीचा आनंद प्रत्येकजण आपापल्यापरीने घेत असतो. त्याची प्रचिती घरकुलमध्ये पहावयास मिळाली. वास्तविक, मानसिक अपंग मुलांचे विश्व इतरांपेक्षा वेगळे. सभोवतालची जाणीव त्यांच्या बुद्धय़ांकावर अवलंबून असल्याने त्यांच्या अनेक कल्पनाही अस्पष्ट असतात. त्यांना काही ठराविक बाबींचे आकलन होते.
ते समजून, त्यांच्या जाणिवा वाढवून, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य नाशिकची घरकुल परिवार संस्था करत आहे. राज्यभरातील जवळपास २५ मुली ‘घरकुल’ अर्थात मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींच्या निवासी वसतीगृहात वास्तव्यास असून वर्षभरात त्यांना उन्हाळ्यात महिनाभर तसेच दिवाळीत पंधरा दिवसांची सुट्टी दिली जाते. दिवाळीच्या सुटीसाठी जाण्यापूर्वी आदल्या दिवशी संस्थेच्यावतीने घरकुलमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे.
या संपूर्ण उत्सवाची काही दिवसांपासून मुलींनी सुरू केलेली तयारी मंगळवारी प्रत्यक्षात आली. पाथर्डी रस्त्यावरील घरकुलची इमारत अनोख्या पद्धतीने सजविण्यात आली होती. लहान-मोठे आकाशकंदील आणि झेंडुंच्या फुलांच्या माळा कशा लावायच्या इथपासून कोणती रांगोळी अधिक चांगली दिसेल, असे सर्व निर्णय या मुलींनी स्वत: घेतले. सजावटीचे संपूर्ण काम दिवसभरात पूर्णत्वास नेण्यात आले. सायंकाळी साऱ्याजणी नटूनथटून नवीन पोषाखात एकत्र जमल्या. या सोहळ्यासाठी संस्थेच्या सुनीता आडके, विद्याताई फडके, वैदेही देशपांडे, अ‍ॅड. अशोक आडके यांच्यासह ‘स्लाईड वेल’ कंपनीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्लाईड वेलच्या कर्मचाऱ्यांनी मुलींसाठी मिठाई व फटाके आणले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फटाके उडविण्यास मुली पुढे सरसावल्या. ज्यांनी याआधी कधी फटाके उडविले नव्हते, त्यांना काहिशी भीती वाटत होती. परंतु, संस्थेचे पदाधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे त्यांनी मग हिंमत दाखवित फटाके फोडण्याचा आनंद लूटला. या उपक्रमात सायंकाळी दीड ते दोन तास चुटकीसरशी कसे निघून गेले, ते कोणाला कळलेही नाही. या सोहळ्याचे वैशिष्ठय़े म्हणजे, दीपालीनगर येथील एका गतिमंद शाळेतील १५ विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत सहभागी झाले होते. त्यांनीही दीपोत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. घरकुलमधील मुलींनी दिवाळीनिमित्त खास ‘फ्लोटींग लॅम्प’ अर्थात पाण्यावर तरंगणारे दिवे व इतर वस्तुंची निर्मिती केली आहे. या निमित्त या दिव्याच्या विक्रीला उपस्थितांकडून प्रतिसाद लाभला.
घरकुलमधील मानसिक अपंग मुलींना समवयस्क मुलींची साथ मिळाल्याने त्यांना त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे विश्व सापडले. या विश्वात त्यांनाही प्रकाशोत्सवाच्या माध्यमातून आशेचा किरण सापडला.