पणत्यांच्या किंमतींमध्ये ४० टक्के वाढ Print

नाशिक / प्रतिनिधी
तमसो मा ज्योतिर्गमय चा संदेश देणाऱ्या दीपोत्सवात आकाशकंदीलांचा लखलखाट असला तरी पणत्यांचे महत्व अधिक असल्याने बाजारपेठेत मातीच्या पणत्यांसह आकर्षक विद्युत रोषणाईचा साज ल्यालेल्या चायना बनावटीच्या पणत्यांच्या माळीही दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पणत्या व रोषणाईच्या साहित्यात ४० टक्के वाढ झाली असली तरी ग्राहकांचा उत्साह तसुभरही कमी झालेला नसल्याचे बाजारपेठेत जाणवते.
अंधाराचे साम्राज्य दूर सारत आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने अंगणासह अवघा परिसर प्रकाशमान करणाऱ्या पणतीचे विविध आकार बाजारपेठेत पहावयास मिळतात. यामध्ये पारंपरिक पणत्यांसह चांदणी, कुयरी, तुळशीवृंदावन, बदाम, गालिचा, स्वस्तीक, असे विविध प्रकार बाजारात २० रुपयांपासून उपलब्ध आहेत. साध्या पणत्यांची विक्री डझनाने होत असून आकर्षक रुप असलेल्या साध्या पणत्या ३० रुपयाला सहा या दराने विक्रीसाठी आहेत. रंगीत पणत्यांसह कुंदन वर्क असलेल्या पणत्या प्रती नग १० रुपये याप्रमाणे उपलब्ध आहेत. यंदा पणत्यांमध्ये राजस्थानी कलेचा प्रभाव प्रामुख्याने पहावयास मिळतो. राजस्थानी मातीत तयार केलेल्या व राजस्थानी कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेल्या पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये  कासवाच्या पाठीवरील पंचारतीसह तीन थरांमध्ये २६ दिवे किंवा तीन थरातील ३१ दिव्यांच्या माळेने ग्राहकांना भुरळ पाडली आहे. नाजूकपणा व आकर्षक कलाकुसर, तेही वाजवी दरात मिळत असल्याने अनेकांचा कल राजस्थानी शैलीच्या पणत्या खरेदीकडे असल्याची माहिती विक्रेते सुनील बाविस्कर यांनी दिली. हे सर्व आकर्षक प्रकार ३०० रुपयांपासून उपल्बध आहेत. कच्चा माल, बाहेरील राज्यातून शहरात येणाऱ्या मालावर लागलेला कर, वाहतूक खर्च, इंधन दरवाढ, यामुळे पणत्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक पणत्यांसह चायना बनावटीच्या विद्युत रोषणाईने सजलेल्या दीपमाळा, पणत्यांची माळ, समई, ७० रुपयांपासुन उपलब्ध आहेत. याशिवाय तरंगत्या पणत्यांचा वापर करून तयार करण्यात आलेले आकर्षक शोपीस २०० रुपयांत उपलब्ध आहे.