‘आम आदमी’ला संघटीत होण्याचे आवाहन Print

नाशिक / प्रतिनिधी
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीला प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने जनलोकपाल हवे असेल तर  संसदेत निवडून येण्याचे आव्हान दिल्याने, आम आदमीने संघटित होवून हा लढा राजकीय क्षेत्रावर यशस्वी करावा, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नाशिक शाखेच्या बैठकीत करण्यात आले.
या नव्या राजकीय परिवर्तनास पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सुमारे दोनशे तज्ज्ञ व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक मुंबई येथे पार पडली. तिचा अहवाल व नाशिकमध्ये हे कार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक बोलावण्यात आली होती. सद्यस्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील या साऱ्या चळवळींनी नव्या राजकीय पर्यायाला पाठिंबा देत भ्रष्टाचार, घराणेशाही व राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा करत सहभागी व परिणामकारक लोकशाहीसाठी एका नव्या राजकीय संस्कृतीची भाषा करणाऱ्या पर्यायाला सर्वतोपरी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत ध्येय-धोरणे व कार्यपद्धतीबाबत साऱ्या देशातून सर्वसाधारण जनतेच्या सूचना व कल्पना मागविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचा अहवाल आधीच सादर झाला असून, बैठकीला विविध क्षेत्रांतील सुमारे ३० कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. गिरधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेत प्रामुख्याने सतीश गायधनी, जितेंद्र भावे, समाधान खैरनार आदींना सहभाग घेतला.