इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त मुलीवर नाशिकमध्ये शस्त्रक्रिया Print

नाशिक / प्रतिनिधी
इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त पाच वर्षांच्या मुलीवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ (मूलपेशी रोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लोटस इन्स्टिटय़ूट ऑफ हिमॅटोलॉजी व ओकॉलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट सेंटर या संस्थेत यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी या मुलीचे कुटुंबिय थेट इराकहून नाशिकला आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
बनार गाझी असे या मुलीचे नाव असून या शस्त्रक्रियेत तिचा भाऊ युनूस याच्या शरीरातील मूलपेशी रक्तातून काढून या मुलीत प्रत्यारोपित करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर तीन आठवडय़ांनी या पेशी नवीन शरीरात स्थिरस्थावर होतात आणि मग आपले कार्य सुरू करतात. या शस्त्रक्रियेत मूलपेशी दिल्याने दात्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. या शस्त्रक्रियेमुळे असे रुग्ण इतरांसारखे आयुष्य जगु शकतात, असा दावा ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. जुनागडे यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रात ३०० ते ४०० रुग्ण थॅलेसेमियाने ग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी रक्तपेढय़ांमधील बराच रक्तसाठा खर्ची पडतो. बोनमॅरो हा त्यावर खात्रीशीर उपाय असल्याचे डॉ. जुनागडे यांनी सांगितले. लंडन येथील प्रशिक्षणादरम्यान ३०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. बनारला लवकरच रूग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.