आचार्य चरकांची वैद्यांसाठी शपथ.. Print

वैद्य विक्रांत जाधव
आचार्य चरक यांची जयंती धन्वंतरी पूजनाच्या दिवशी सर्वत्र साजरी केली जाते. या निमित्ताने त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात दिलेले योगदान, त्यांची कार्यपध्दती याविषयी..
‘धनत्रयोदशी’ हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून ओळखला जातो. आरोग्यरूपी धनाच्या प्रार्थनेसाठी, भगवान धन्वंतरीची मनोभावे पूजा करून आरोग्याचे आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न या माध्यमातून होतात. संपूर्ण आरोग्याची चिकित्सा ज्या ग्रंथात करण्यात आली, त्याला ‘चरक संहिता’ नावाने ओळखले जाते. चरकसंहितेत अध्ययन, अध्यापन, अनुभूती या आयुर्वेदीय ध्येयावर संपूर्णत: भर देण्यात आला आहे.
चरक संहितेतून असे काय प्राप्त होते, जेणेकरून आयुर्वेदाचे अध्ययन करणारे विद्यार्थी आयुर्वेदावर अढळ निष्ठा ठेवून सर्वोत्तम वैद्य ठरतात हा अनेकांना आजवर पडलेला प्रश्न. आज दिवसागणिक येणारे अनेक प्रयोगांचे निष्कर्ष मुळातच चरकाचार्याच्या चरक संहितेत आढळतात. चरक हे प्रथम शास्त्रज्ञ होते, ज्यांनी प्रतिकारक्षमता, पचनशक्ती, शरीरस्वास्थ क्रिया यांचे विवेचन केले. त्यांना शरीर विज्ञानांचे जनकही म्हणतात. त्यांनी हदय सर्व प्राणाला जबाबदार असल्याचे सांगत शरीरात मल वाटणाऱ्या यंत्रणेत अडथळा निर्माण झाल्यास, पचनात अडथळा निर्माण झाल्यास व्याधी निर्माण प्रक्रिया सुरू होते हे मांडले. चरकांनी आत्रेय, अग्निवेशाच्या लिखाणावर संशोधन करून नंतर ते चरकसंहिता म्हणून प्रसिध्द झाले. आज या संहितेचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.
मानवी आरोग्याचा अभ्यास करताना चरक यांनी दीर्घायु हे मानवाच्या व्यक्ती प्रकृतीवर अवलंबून असून त्यांचे विश्लेषण करतांना ऋतुचर्या व दिनचर्येवर भर दिला. सुरूवातीपासून त्यांनी व्याधी निर्माण झाल्यानंतर त्यावर चिकित्सेसाठी प्रयत्न करण्यापेक्षा त्याचा प्रतिकार करून आरोग्य राखावे हे महत्वपूर्ण तत्व मांडले. माणसाच्या गुणसुत्रातील दोषामुळे येणाऱ्या पिढीत व्यंग असू शकते, असा विचार मांडून त्यांनी निरोगी पिढीसाठी गर्भधारणे अगोदर प्रयत्न केल्यास यश मिळते हे विविध उपायांनी मांडले. चरकाचार्यानी चिकित्सा, व्याधी, प्रतिबंध यांचे स्पष्टीकरण करतांना उत्तम रुग्ण, परिचारिका, औषध व उत्तम वैद्य निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. जो वैद्य चिकित्सक मनुष्याच्या नेमक्या व्याधींपर्यंत पोहचू शकत नाही, तो त्यावर योग्य उपचार करू शकत नाही. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया अध्ययन करण्यावर अवलंबून आहे. चिकित्सकाने वातावरण, निसर्ग यांचा रुग्णावर होणारा परिणाम निश्चितपणे ध्यानात घ्यावा व त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. रोग मुळापासून दुर करण्यासाठी वैद्याचे प्रयत्न असायला हवे असेही त्यांचे सांगणे होते. वैद्यकीय व्यवसायाची सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी रुग्ण हितासाठी व वैद्यकीय व्यवसायातील नितीमत्ता यासाठी एक शपथ दिली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुनश्च सर्व चिकित्सकांनी धन्वंतरीसमोर ही शपथ घेऊन रुग्ण व डॉक्टर यांचे नाते दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे.
चरकाचार्याची शपथ..
‘दिवस रात्र मी शरीर, मन व आत्म्याच्या एकाग्रतेने, रुग्णाच्या हिताचा विचार करण्यासाठी मग्न राहीन. मी कोणत्याही प्रकारे रूग्णास दुखविण्याचा प्रयत्न माझ्या जीवितासाठी किंवा माझ्या जीवन वैभवासाठी कदापी करणार नाही. मी माझ्या व्यवसायाशी, चिकित्साशास्त्राशी प्रामाणिक राहून व्यभिचार, नितीमूल्यांचे उल्लंघन करणार नाही. मी रुग्ण सेवेत अत्यंत नम्रपणे, कोणतेही भडक रूप धारण न करता राहील. तसेच पापी माणसाच्या सानिध्यात मद्य घेऊन येणाऱ्या तसेच गुन्हा करणाऱ्यांसोबत राहणार नाही. मी सातत्याने शुध्द, निश्चित खऱ्या, परिपूर्ण शब्दांचा, वाक्यांचा उच्चार करीन. ज्या योगे प्रत्येकाला आनंद व ज्ञान प्राप्त होईल. माझी वर्तणूक नेहमीच ज्ञानाच्या भिंगातून सर्वाना उद्बोधन करीत राहील’