जिव्हाळा जपणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले Print
नाशिक वृत्तान्त
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची नाशिकसह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी व्याख्याने झाली. त्यांच्या व्याख्यानांमुळे प्रभावित होऊन अनेक जण दूपर्यंत त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी जात. नाशिकचे ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर हे त्यापैकीच एक. त्यांनी भोसले यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना.
म हाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा लौकीक कायम राहील. त्यांच्या वक्तृत्वास वाचन, चिंतन, मनन, अध्यात्माचे अधिष्ठान होते. त्यामुळेच त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांच्या जीवनात ज्ञान व भक्तीचा सुरेख संगम झाला होता. विद्वान हा वक्ता असतोच असे नाही, पण शिवाजीराव विद्वानही होते आणि चांगले वक्तेही होते. वक्ता हा लेखक, साहित्यिक असेल असे नाही, पण या सर्व पैलुंना स्पर्श करणारे व्यक्तिमत्व भोसले यांचे होते. बहुजन समाजातील ग्रामीण भागातील एका शिक्षकाचा मुलगा आपल्या व्याख्यानाद्वारे लोकशिक्षणाचे कार्य करीत असे, ही घटनाच अलौकिक म्हटली पाहिजे.
आपल्याकडे अनेक वक्ते असतील, परंतु ते शिवाजीराव भोसले नाहीत. त्यांच्या वक्तृत्वाला खरोखर तोड नव्हती. त्यांच्या मधूर वाणीतील बोधामृताचे झरे सुविचारांचे मळे आणि विनोदाचे फवारे रसिक श्रोत्यांची मने फुलवित असत. त्यामुळेच त्यांची व्याख्याने सतत ऐकाविशी वाटत असत. वक्तृत्व ही एक कला असून ते लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, याची प्रचिती शिवाजीरावांच्या व्याख्यानांमधून पदोपदी अनुभवास येत होती. मनाची मशागत करून माणूस घडविण्याचे कार्य त्यांनी आपल्या व्याख्यानांद्वारे केले. ते जसे विद्यार्थीप्रिय प्राचार्य होते तसे ते लोकप्रिय वक्तेही होते. अध्यापक, प्राध्यापक व लोकशिक्षक ही त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांचे भाषण म्हणजे न अडखळणारा विचारांचा प्रवाह होता. भाषा शुध्दता, अर्थसंगती, विचारांची अचूक मांडणी ही त्यांनी अभ्यासाने साध्य केली होती.
पुणे व नाशिक शहरातील प्राचार्य भोसले यांची अनेक व्याख्याने ऐकली आहेत. या विचारवंत, आचारवंत वक्त्याशी परिचय व्हावा, अशी तीव्र इच्छा होती. त्यामुळेच प्रतिवर्षी पंढरीच्या वारीप्रमाणे त्यांच्या सर्व व्याख्यानांना उपस्थित राहात असे. एकदा त्यांचे व्याख्यान संपल्यानंतर त्यांना भेटलो. ‘आपण माझ्या एकाही पत्रास अद्याप उत्तर दिलेले नाही.’ असे सांगितले. तेव्हा ते नम्रपणे म्हणाले, ‘माझ्याकडे दररोज शेकडो पत्रे येतात. त्या सर्वाना उत्तर पाठविणे शक्य होत नाही. त्यातच पत्रांना उत्तर देण्याची मला सवय नाही. तेव्हा आपण रागावू नका.’ त्यांचे हे उत्तर ऐकून म्हणालो, ‘तुम्ही आमच्या भावना फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे चुरगळून टाकल्या.’ नंतर त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली. त्यांना भगूर भेटीचे निमंत्रण दिले. नंतर भगूरचा नगराध्यक्ष या नात्याने त्यांना सातत्याने पत्र लिहून व संधी मिळेल तेथे भेटून भगूर भेटीचा आग्रह धरला. भावनिक व प्रेमळ आग्रह लक्षात घेऊन ते भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या उद्घाटन समारंभास २२ डिसेंबर १९७९ रोजी प्रथमच आले. यामधून आमची आदरयुक्त मैत्री झाली. त्यानंतर ते नाशिकला आले की, माझ्या घरी चहापानास येत असत. मुला-मुलींच्या शिक्षणाची विचारपूस करू लागले. त्यातून आमचा कौटुंबिक जिव्हाळा वाढत गेला. बापूसाहेबांची एकदा एखाद्याशी ओळख झाली की, ते त्यांना कायम स्मरणात ठेवत असत. व्याख्यान संपल्यावर कितीही थकले असले तरी आमच्यापाशी येऊन आस्थेने विचारपूस करीत असत. बापूसाहेब तथा शिवाजीराव व्याख्यानांचा व्याप सांभाळून घरातील संस्कारांकडे लक्ष देत असत. एकदा व्याख्यान संपल्यानंतर ते म्हणाले, ‘येथील सार्वजनिक वाचनालयात मला काही पुस्तके बघावयाची आहेत’. मी विचारले, ‘आपणास कोणती पुस्तके हवी आहेत?’ त्यावर ते म्हणाले, ‘पुस्तके माझ्यासाठी नको, लहान नातू उगाच काहीतरी बडबडण्यापेक्षा त्याला बालगीते ऐकविली तर ती अधिक चांगली.’ या घटनेवरून त्यांचे घरातील संस्काराकडे लक्ष असल्याचे दिसून येते. त्यांनी प्रकृती स्वास्थ्यासाठी व्याख्यानांना जाणे बंद केले, तरी आम्ही दूरध्वनिवरून एकमेकांची विचारपूस करीत होतो. आता त्यांच्या आठवणी मी आयुष्यभर विसरू शकत नाही.