हिंगोलीत यंत्रणा कामाला Print

स्वस्त धान्य घोटाळ्यांचा सहसचिव घेणार आढावा
हिंगोली/वार्ताहर
जिल्ह्य़ातील स्वस्त धान्य दुकानांमधील घोटाळ्यांचा आढावा घेण्यासाठी नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव बा. सो. कोळसे ११ व १२ ऑक्टोबरला जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुरवठा विभागातील विविध विभागांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. स्वस्त धान्य काळ्याबाजारात विक्रीस जात असल्याबाबत औंढा नागनाथ, गोरेगाव, सेनगाव, कळमनुरी व कुरुंदा येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. या पाश्र्वभूमीवर सहसचिवांचा दौरा सुरळीत पार पडावा, यासाठी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली आहे. केरोसीन, पामतेल, शिधापत्रिका या बाबत कोळसे आढावा घेणार आहेत. त्या दृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. धान्याची उचल व वाटप, नावीन्यपूर्ण योजनेखाली प्राप्त अनुदान व खर्च याचाही आढावा घेतला जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सतर्क करण्यात आले आहे. आढावा बैठकीस सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे पत्र देण्यात आले आहे.