शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करा- प्रा. खान Print

परभणी/वार्ताहर
शिक्षण हक्क कायद्यात शाळेवर सनियंत्रण ठेवण्याचे काम शाळा व्यवस्थापन समितीकडे आहे. शिक्षकांसोबतच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा सर्वागीण विकास अपेक्षित आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम असल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी केले.
जिल्हय़ातील शाळा व्यवस्थापन समिती कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक आठवले, उपशिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते. फौजिया खान म्हणाल्या, की शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड गुणवत्तेवर व्हायला हवी. सदस्यांची निवड करताना त्यांची कामे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या आदी गोष्टी त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. सरकारच्या नियमावलीप्रमाणे या सदस्यांची निवड करावी. यात शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असणे आवश्यक आहे. समिती सदस्यांची निवड करताना विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
निवड झालेल्या सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना त्यांची कामे, जबाबदाऱ्या आदींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण आराखडा शालेय शिक्षण विभागाने तयार करावा, असे प्रा. खान यांनी सांगितले. सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.