मद्यधुंद वाहतूक नियंत्रकास कोंडले Print

लातूर/वार्ताहर
चाकूर आगारातील वाहतूक नियंत्रकाने मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांशी हुज्जत घातली. अखेर संतप्त प्रवाशांनी या अधिकाऱ्यास कार्यालयात कोंडून ठेवल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. गांधीजयंतीची सुटी असल्यामुळे वाहतूक नियंत्रक एस. व्ही. केंद्रे आपल्या कक्षात सायंकाळी मद्यप्राशन करीत होते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र, ते व्यवस्थित बोलण्याच्या अवस्थेत नाहीत, हे पाहून संतापलेल्या प्रवाशांनी केंद्रे यांना त्यांच्या कक्षात कोंडले व वरिष्ठांकडे याविषयी तक्रार केली. काही काळ प्रवाशांनी बसवाहतूकही बंद केली. पोलिसांनी या अधिकाऱ्यास वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. विभागीय वाहतूक अधिकारी बाळासाहेब घुले, एस. पी. साळुंके यांनी बसस्थानकात येऊन प्रवाशांची समजूत घातली.